Rakesh Sachan guilty: शिक्षा सुनावण्यापूर्वीच योगी सरकारमधील मंत्री फाईलसह कोर्टातून फरार; आर्म्स अॅक्टमध्ये दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 04:54 PM2022-08-07T16:54:42+5:302022-08-07T16:54:53+5:30
Rakesh Sachan guilty: 6 ऑगस्ट रोजी कानपूरमधील न्यायालयाने कॅबिनेट मंत्री राकेश सचानला 1991 शस्त्रास्त्र कायदा प्रकरणात दोषी ठरवले आहे.
Rakesh Sachan News:उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या राकेश सचान यांची सध्या चर्चा होत आहे. शनिवारी 6 ऑगस्ट रोजी कानपूरमधील एका न्यायालयाने राकेश सचानला 1991 शस्त्रास्त्र कायदा प्रकरणात दोषी ठरवले. या निर्णयावर नाराज होऊन राकेश सचान कोर्टातून आदेशाची फाईल घेऊन पळाल्याचे वृत्त आले असून शनिवारपासून ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. सचान यांचा राजधानी लखनऊ येथे सरकारी बंगला आहे तर कानपूरमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. मात्र त्यांचे लोक सचानबाबत काहीही सांगणे टाळत आहेत.
दुसरीकडे मंत्री राकेश सचान यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना सांगितले की, काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असून ते फरार झाल्याची चर्चा दिशाभूल करणारी आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल, त्याचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले. शनिवारी कोर्टाच्या रीडरने कोतवालीमध्ये मंत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची तक्रार दिली आहे. तक्रार मिळाल्यानंतर कानपूर पोलिसांचे सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जातील, सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
एक-दोन दिवसांत तपास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. मंत्री राकेश सचान यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, ते फरार झाले नसून, कानपूरच्या निवासस्थानी आहेत. या प्रकरणाने ज्या प्रकारे पेट घेतला आहे, ते पाहता त्यांना लखनऊला बोलावले जाऊ शकते, असे मानले जात आहे. दुसरीकडे, दुपारी राकेश सचान यांना आजारपणामुळे घेऊन गेल्याचे वकिलांच्या वतीने सांगण्यात आले आहे.