राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:43 AM2021-12-16T11:43:03+5:302021-12-16T11:44:10+5:30

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं

Rakesh Tikait after 383 days at home, tears of joy flowed in the eyes of the family | राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

Next
ठळक मुद्देगाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरू नानक जयंतीदिनी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एकच जल्लोष झाला. शेतकऱ्यांनी जिलेबी वाटून आपल्या लढ्याला यश आल्याचं सेलिब्रेशन केलं. यावेळी, अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. दिल्लीच्या सीमारेषेवरील या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान आंदोलनाचे प्रमुक राकेश टीकैत यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं. त्यानंतर, शहापूर मार्गे सोरम या गावी पोहोचला. गावातही त्यांचं जोरजोरात स्वागत करण्यात आलं. बुधवारी रात्री उशिरा 1.00 वाजता सिसौलीच्या पट्टी चौधरीस्थित आपल्या गावातील घरी ते पोहोचले. यावेळी टिकैत यांचं संपूर्ण कुटुंब भावूक झाल्याचं दिसून आलं. घरातील सर्वच महिलांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, राकेश यांची मोठी बहीण ओमबीरी यांनी राकेश टिकैत यांना टीळा लावत त्यांचं औक्षण केलं. तत्पूर्वी त्यांनी किसान भवन येथे जाऊन वडिल चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

गाझीपूर बॉर्डरवर तीन कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनचे प्रवक्ते असलेल्या राकेश टिकैत यांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढत तब्बल 382 दिवसांपूर्वी आपलं घर सोडलं होतं. जोपर्यंत केंद्र सरकार तीन कृषी कायदे वापस घेत नाही, तोपर्यंत आपण घरी वापस जाणार नाही, असा एल्गारच टिकैत यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. अखेर, या आंदोलकांनी सरकारला आपल्यापुढे झुकायला लावले. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर, संसदेत हे तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतरच राकेश टिकैत यांनी आपल्या घराची वाट धरली. त्यामुळे, तब्बल 383 दिवसांनी घरी पोहचताच, त्यांचे कुटुंब भावनिक झाल्याचे दिसून आले. 
 

Web Title: Rakesh Tikait after 383 days at home, tears of joy flowed in the eyes of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.