वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 06:43 AM2021-11-21T06:43:34+5:302021-11-21T06:45:25+5:30
महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता.
नवी दिल्ली : आपले वडील महेंद्रसिंग टिकैत यांनी ३३ वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. १९८८ साली महेंद्रसिंग टिकैत यांनी केलेल्या शेतकरी आंदोलनापुढे तत्कालीन केंद्र सरकाराला झुकावे लागले होते. आता राकेश टिकैत यांच्या पुढाकाराने होत असलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला माघार घेऊन तीन नवे कृषी कायदे रद्द करावे लागले.
महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. त्यावेळी लाल किल्ला परिसरात शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला होता. महेंद्रसिंग टिकैत यांनी सादर केलेल्या ३५ मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन केंद्रातील राजीव गांधी सरकारने दिले. केंद्र सरकार झुकल्यानंतर महेंद्रसिंग टिकैत यांनी आंदोलन मागे घेतले होते.
शेतकऱ्यांच्या सामर्थ्यापुढे केंद्र सरकार झुकल्याच्या घटनेची पुनरावृत्ती २०२१ साली महेंद्रसिंग टिकैत यांचे पुत्र राकेश टिकैत यांच्यामुळेही झाली. तीन नवे कृषी कायदे मोदी सरकारने संसदेत मंजूर केले. मात्र, हे कायदे अन्यायकारक असल्याचा शेतकरी आंदोलकांचा आक्षेप होता. आंदोलक किमान हमीभावासाठीही आग्रही आहेत. त्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले, त्यामध्ये भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचाही समावेश आहे. सुमारे वर्षभर सुरू असलेल्या आंदोलनात २६ जानेवारीला लाल किल्ला परिसरात हिंसाचार झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना नोटीस बजावली.
शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय -
- गाझीपूर येथील सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याचे टिकैत यांनी संकेत दिले होते.
- मात्र, देशभरातील शेतकरी आंदोलनाचा रेटा पाहून केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱ्यांचा हा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी व्यक्त केली होती.