Rakesh Tikait: मोठी बातमी! राकेश टिकैत यांची BKU मधून हकालपट्टी, नरेश टिकैत यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 03:22 PM2022-05-15T15:22:15+5:302022-05-15T15:22:29+5:30
भारतीय किसान युनियनमध्ये आता दोन गट पडले आहेत. टिकैत बंधू यांची हकालपट्टी केल्यानंतर BKU अराजकीय नावाने नवीन संघटना सुरू करण्यात आली आहे.
लखनौ: भारतीय किसान युनियनशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन(BKU)मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे.
चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन म्हणजेच बीकेयू त्यांच्या पुण्यतिथीदिनीच दोन गटात विभागली गेली. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली नवीन बीकेयू (अराजकीय) स्थापन करण्यात आली. राकेश टिकैत हे दोन दिवस लखनऊमध्ये राहून डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतले होते, मात्र त्यांना यश आले नाही. संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून राजकारणाकडे जात असल्याने अनेकजण टिकैत यांच्यावर नाराज आहेत.
शेतकऱ्यांचा लढा लढणे हेच माझे काम- राजेश
बीकेयू (अराजकीय) चे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राजेश सिंह चौहान यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, 'कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे की, भारतीय किसान युनियन (अराजकीय) आता मूळ भारतीय किसान युनियनच्या जागी स्थापन करण्यात आली आहे. माझ्याकडे संस्थेचा 33 वर्षांचा इतिहास आहे. 13 महिन्यांच्या आंदोलनानंतर आम्ही घरी आलो तेव्हा आमचे नेते राकेश टिकैत हे राजकारणाने प्रेरित दिसले. आमचे नेते कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली येऊन एका पक्षाचा प्रचार करण्याचे आदेशही देत असल्याचे आपण पाहिले. राजकारण करणे किंवा कोणत्याही पक्षाचे काम करणे हे माझे काम नाही. शेतकऱ्यांचा लढा लढणे हेच माझे काम असेल. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.'
राजेशसिंह चौहान यांच्याकडे नेतृत्व
रविवारी म्हणजेच आज चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांची 11वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त लखनौ येथील ऊस संशोधन संस्था येथे सकाळी 9 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये मूळ भारतीय किसान युनियन बदलून भारतीय किसान युनियन (अराजकीय) करण्यात आली. कार्यक्रमाचे नाव होते - 'शेतकरी आंदोलनाची स्थिती आणि दिशा'.
राकेश टिकैत असंतुष्टांना पटवून देऊ शकले नाहीत
असंतुष्ट शेतकरी नेत्यांचे मन वळवण्यासाठी बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत शुक्रवारी लखनौला पोहोचले होते. ते हरनाम सिंग यांच्या घरी थांबले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नाराज गटाशी बोलणी झाली, मात्र तोडगा निघाला नाही. यानंतर शनिवारी संध्याकाळी टिकैत लखनौहून मुझफ्फरनगरला परतले. तिथे आज महेंद्रसिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठा कार्यक्रम होता.