Rakesh Tikait: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, बंगळुरुत पत्रकार परिषदेत घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 02:58 PM2022-05-30T14:58:47+5:302022-05-30T15:39:27+5:30
Rakesh Tikait: बंगळुरू येथील गांधी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला
Rakesh Tikait: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकल्याची घटना घडली आहे. टीकैत बंगळुरू येथील गांधी भवनात पत्रकार परिषद घेत होते, यादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. दरम्यान, पोलिसांनी शाई फेकणाऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युधवीर सिंह गांधी भवनमध्ये पत्रकार परिषद घेत होते. दरम्यान, एका व्यक्तीने त्यांच्यावर काळी शाई फेकली. एका स्थानिक वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओवरून दोन्ही शेतकरी नेते स्पष्टीकरण देण्यासाठी आले होते.
शाई फेकणारा अटकेत
पत्रकार परिषद सुरू असतानाच तेथे उपस्थित लोकांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी एका व्यक्तीने शेतकरी नेत्यांवर शाई फेकली. यानंतर तिथे उपस्थित लोकांमध्ये तुफान हाणामारी आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. पत्रकार परिषद सभागृहात गोंधळ घालणाऱ्या आणि राकेश टिकैत यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या काही जणांना तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
Bengaluru | No security has been provided by local police here. This has been done in collusion with the government: Bhartiya Kisan Union leader Rakesh Tikait on ink attack on him pic.twitter.com/P5Jwcontc7
— ANI (@ANI) May 30, 2022
टिकैत स्टिंग ऑपरेशन प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी आले होते
हे लोक शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे समर्थक असू शकतात, असे बोलले जात आहे. एका खाजगी वाहिनीने नुकतेच कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन केले होते. चंद्रशेखर शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली पैसे उकळतात असा दावा केला होता, या स्टिंग ऑपरेशनमध्ये चंद्रशेखर यांनी शेतकरी नेते युधवीर सिंह यांचे नाव घेतले होते.
गांधी भवनात पत्रकार परिषद सुरू होती
यावर खुलासा करण्यासाठी राकेश टिकैत आणि युधवीर सिंग आज बंगळुरूत आले होते आणि गांधी भवनात पत्रकार परिषद घेत होते. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत, चंद्रशेखर यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही, देशव्यापी शेतकरी आंदोलनादरम्यानही चंद्रशेखर यांची संशयास्पद पार्श्वभूमी समजल्यावर त्यांनी चंद्रशेखर यांना आंदोलनातून बाहेर काढले होते, अशी माहिती दिली.