Petrol Diesel Price Cut: “पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते”: राकेश टिकैत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 05:36 PM2021-11-04T17:36:01+5:302021-11-04T17:36:55+5:30
Petrol Diesel Price Cut: केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशवासीयांना इंधनदर कपातीचे मोठे गिफ्ट दिले आहे. इंधनावरील कर कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी झाल्या आहेत. यानंतर भाजपशासित राज्य सरकारांनी करांमध्ये कपात करून राज्यातील जनतेला आणखी दिलासा आहे. यानंतरही विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यातच शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते, असे म्हटले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात केली आहे. आधी ५० रुपयांनी दर वाढवायचे आणि फक्त ६ रुपयांनी कमी करायचे, यात काही अर्थ नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांपर्यंत खाली आणायला हवे होते, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
देशवासीयांना काहीसा दिलासा मिळू शकेल
देशात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे १०० रुपयांच्या वर गेले आहेत. त्यात आता केवळ ५ ते १० रुपयांची कपात करण्यात येत आहे. यामुळे देशवासीयांना काहीसा दिलासा मिळू शकेल. मात्र, यात आणखी कपात करणे आवश्यक आहे, असे राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. इंधनावरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी करावा, असे आवाहन केंद्र सरकारने सर्व राज्यांना केले आहे. तसे झाल्यास इंधन आणखी स्वस्त मिळू शकेल. हा शेतकरी, माल व प्रवासी वाहतूकदारांसाठी दिलासा आहे.