Rakesh Tikait : "महापंचायत शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल" 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 08:26 AM2021-11-10T08:26:42+5:302021-11-10T08:38:57+5:30

Rakesh Tikait And Modi Government : राकेश टिकैत यांनी आपल्या ट्विटमधून शेतकऱ्यांना संदेश व केंद्र सरकारला सूचक इशारा दिला आहे.

rakesh tikait says kisan mahapanchayat organized in lucknow on november 22 will be historic | Rakesh Tikait : "महापंचायत शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल" 

Rakesh Tikait : "महापंचायत शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल" 

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमधून त्यांनी शेतकऱ्यांना संदेश व केंद्र सरकारला सूचक इशारा दिला आहे. "ही महापंचायत ऐतिहासिक असेल आणि शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल" असं म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी अनेकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता टिकैत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

"संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने 22 नोव्हेंबर लखनऊमध्ये किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महापंचायत ऐतिहासिक असेल आणि शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल. महापंचायतीनंतर आता पूर्वांचलमध्ये देखील शेतकरी आंदोलन आणखी गतीमान होईल" असं ट्विटमध्ये टिकैत यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी 22NovemberLucknowKisanMahapanchayat हा हॅशटॅग देखील वापरला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला होता. "शेतकरी आंदोलनात आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याबद्दल मोदी सरकारकडून शोक देखील व्यक्त केला जात नाही. मोदी हे देशातील शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत" असं म्हणत टिकैत यांनी टीकास्त्र सोडलं.

"750 शेतकऱ्यांचा मृत्यू पण मोदी सरकारने व्यक्त केला नाही शोक"

"शेतकरी आंदोलनात आतापर्यंत सुमारे 750 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र भारत सरकारकडून त्यांच्या मृत्यूवर शोकही व्यक्त करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत, असं शेतकऱ्यांना वाटू लागलंय. शेतकरी देशापासून वेगळे आहेत, असा त्यांच्याबद्दल विचार केला जातो" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलन सोडून कुठेही जाणार नाहीत. जर एखादे सरकार जर पाच वर्षे चालत असेल, तर जोपर्यंत भारत सरकार एमएसपी सुनिश्चित करणारा कायदा करत नाही आणि शेतीचे तीन कायदे रद्द करत नाही तोपर्यंत लोकांचा पाठिंबा असलेले हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. 

"जेसीबीच्या सहाय्याने प्रशासनाने तंबू हटवले तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील" 

काही दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांनी प्रशासनाला एक इशारा दिला होता. "जेसीबीच्या सहाय्याने प्रशासन येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. जर त्यांनी तसं केलं तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं होतं. दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर टिकैत यांनी हा इशारा दिला. "जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू" असं म्हटलं. दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टीकरी सीमेवरील बॅरीकेड्स हटवणं सुरू केलं आहे. 


 

Web Title: rakesh tikait says kisan mahapanchayat organized in lucknow on november 22 will be historic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.