दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये उद्या 'चक्का जाम' होणार नाही, राकेश टिकैत यांनी सांगितलं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 06:26 PM2021-02-05T18:26:45+5:302021-02-05T18:28:05+5:30
Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union : संयुक्त किसान मोर्चाकडून ६ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाकडून ६ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र, उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे उद्या चक्का जाम होणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी सांगितले.
जे लोक याठिकाणी (शेतकरी आंदोलनात) येऊ शकले नाहीत, ते आपआपल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करतील, हा चक्का जाम दिल्लीत होणार नाही, असे राकेश टिकैत यांनी सांगितले. याचबरोबर, उद्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील चक्का जाम आंदोलन केले जाणार नाही. दिल्ली सोडून देशाच्या अन्य भागातील रस्ते बंद केले जातील. कारण, कधीही दिल्लीला बोलाविले जाऊ शकते, त्यामुळे त्यांना स्टॅण्डबाय ठेवले आहे, असे राकेश टिकैत म्हणाले.
There will be no road blockade in Uttar Pradesh and Uttarakhand tomorrow; roads will be blocked in rest parts of the country excluding Delhi. The reason is that they can be called to Delhi any time, so they are kept on standby: Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/5F1jddM7j8
— ANI (@ANI) February 5, 2021
दरम्यान, राकेश टिकैत यांच्या म्हणण्यानुसार, चक्का जाम केवळ तीन तास (दुपारी १२ ते ३ ) या वेळेत होईल. या काळात शेतकरी आपआपल्या भागांमधील रस्ते जाम करतील आणि रस्त्यांवर बसून कृषी कायद्यांना विरोध दर्शवतील. तीन तासानंतर आंदोलकांकडून गाव, ब्लॉक, जिल्हास्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.
याचबरोबर, शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, चक्का जाम दरम्यान शेतकरी संघटना सर्वसामान्य लोकांना शेंगदाणे, हरभरा, पाणी, फळे व इतर वस्तू खाण्यासाठी देतील. प्रत्येक गावातून दोन ट्रॅक्टर दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी येतील. ते आंदोलनाच्या ठिकाणी काही दिवस थांबतील आणि नंतर गावात परततील.