शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात? राकेश टिकैत यांनी घेतला 'हा' निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:30 AM2022-04-07T11:30:40+5:302022-04-07T11:31:53+5:30
Rakesh Tikait : सरकारने एमएसपीवर (MSP) हमी कायद्यासह इतर मुद्द्यांवर दिलेले आश्वासन मोडले आहे, असे भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असे भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 'सरकारने एमएसपीवर (MSP) हमी कायद्यासह इतर मुद्द्यांवर दिलेले आश्वासन मोडले आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी पुन्हा एकदा संघटित होऊन आंदोलन करणार आहेत.'
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राकेश टिकैत म्हणाले, "आम्ही अद्याप आंदोलनाची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु लवकरच ते सुरू करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासोबतच, शेतकऱ्यांनी सरकारकडे किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायद्यासह अनेक मागण्या केल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार सर्व काही विसरले असले तरी शेतकरी मात्र विसरलेले नाहीत. सर्व लक्षात आहे. वाजवी दरात वीज, सिंचन आणि पिकांसाठी एमएसपी या मुद्द्यांवर आतापर्यंत काहीही केले गेले नाही."
कार्यकर्त्यांची बैठक
दुसरीकडे, मुझफ्फरनगर येथील महावीर चौकातील कार्यालयात कामगारांच्या बैठकीत किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजवीर सिंह जादौन म्हणाले की, कामगारांनी संघटित व्हावे. सरकार विरुद्ध पुन्हा दीर्घ संघर्ष होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा, नवीन राठी, ओमपाल मलिक, कुलदीप त्यागी, गुलबहार, अशोक चौधरी, रविंद्र कुमार, मान सिंग, राजीव राठी उपस्थित होते.