Raksha bandhan: भावाच्या मृतदेहाला राखी बांधून ५ बहिणींनी दिला निरोप; मनाला वेदना देणारं दृश्य पाहून गाव हळहळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 04:55 PM2021-08-23T16:55:01+5:302021-08-23T16:56:15+5:30
रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले
नलगोंडा – एकीकडे सगळ्या देशात रक्षाबंधनानिमित्त उत्साहाचं वातावरण होतं. सोशल मीडियावर बहिण भावाला राखी बांधतानाचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील परंतु एक फोटो असा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल. नकळत डोळ्यातील अश्रू तुम्हाला भावनिक करतील. या फोटोमागची कहाणी ह्दयद्रावक आहे.
तेलंगानातील नलगोंडा येथे ५ बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली परंतु राखी बांधणारा हात कधीच बहिणीच्या आशीर्वाद देण्यासाठी उचलणार नाही. रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. नलगोंडा तालुक्यातील मडगुलापल्ली येथील गावातील ही घटना आहे. याठिकाणी ५० वर्षीय चिंतापल्ली लक्ष्मण नावाच्या व्यक्तीचं रविवारी निधन झालं.
चिंतापल्ली लक्ष्मण अनेक दिवसांपासून आजारी होता. रविवारी एकीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात होता. भावाला राखी बांधण्यासाठी चिंतापल्ली यांच्या ५ बहिणी प्रतिक्षा करत होत्या. भावाच्या निधनाची बातमी कळताच बहिणींना मोठा धक्काच बसला. आपला भाऊ आता कधीच परतणार नाही यावर कुणालाही विश्वास बसत नव्हता. परंतु बहिणींना अंत्यसंस्कारावेळी भावाचा हात रिकामा ठेवला नाही. भावासाठी खरेदी केलेली राखी त्याच्या मृतदेहाला बांधावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसावी. भावाच्या पार्थिवावर राखी बांधताना बहिणींचे ते दृश्य पाहून प्रत्येक ह्दय पिळवटून टाकणारं होतं.
BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी
राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं. बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असलेले चिरंजीलाल यांचे स्वातंत्र्य दिनी निधन झाले. ह्रदयविकाराच तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या हरसौर या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेनुसार चीता थंड करण्यासाठी त्रिपादुका अन् अस्थीकलश ठेवण्यात आला होता. चिरंजीलाल यांच्या बहिणीने या अस्थीकलशालाच राखी बांधली.