प्रत्येक जिल्ह्यात सभा, २५० पत्रकार परिषदा घेणार, भाजपा CAAबाबतचे गैरसमज असे दूर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 07:27 PM2019-12-21T19:27:48+5:302019-12-21T19:28:35+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पसरत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे.
नवी दिल्ली - नुकताच मंजूर झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित एनआरसी कायद्याच्या विरोधात सध्या देशात हिंसाचार उसळला आहे. समाजातील बुद्धिमंतांसोबत सर्वसामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पसरत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतचे गैरसमज दूर करून या कायद्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी भाजपा २५० ठिकाणी पत्रकार परिषदा आणि प्रत्येक जिल्ह्यात एक सभा घेणार आहे. ३ कोटी कुटुंबांपर्यंत थेट पोहोचण्याचा भाजपाचा उद्देश आहे, अशी माहिती भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी सांगितले.
नागरिकत्व कायद्याचे समर्थन करण्यासाठी भाजपाने आखलेल्या कार्यक्रमाबाबत भूपेंद्र यादव म्हणाले की, ''नागरिकत्व कायद्याबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा प्रत्येक जिल्हाात एक सभा आजोजित करणार आहे. त्याशिवाय २५० ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जाईल. तसेच आम्ही पुढच्या १० दिवसांत मोहीम राबवून आम्ही ३ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत.''
Bhupender Yadav, BJP in Delhi: Our party has decided that in the coming 10 days we will launch a special campaign and contact over 3 crore families for Citizenship Amendment Act. We will hold press briefings in support of this Act at more than 250 places. pic.twitter.com/o8gHHIeMkv
— ANI (@ANI) December 21, 2019
''विरोधकांकडून नागरिकत्व कायद्याबाबत विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा आणि खोटेपणाचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. या कायद्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक छळाचे बळी ठरलेल्या अनेक लोकांना नवीन आशा, विश्वास मिळण्याच मार्ग मोकळा झाला आहे,'' असे धर्मेंद्र यादव म्हणाले.
दरम्यान, बिहारमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करताना काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने हिंसाचार केला. काँग्रेसला अशा प्रकारचे हिंसाचाराचे राजकारण मान्य आहे का? अशी विचारणा धर्मेंद्र यादव यांनी केली आहे.