रामभक्त गांधीजी, तेव्हा रामनामाचे बीज गांधीजींनी मिरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:43 AM2019-11-04T05:43:08+5:302019-11-04T05:44:45+5:30
अंधाराविरुद्ध काय करावे लागते? लाठ्या-काठ्या हाती घेऊन काही अंधार घालवता येणार नसतो.
- प्रा. डॉ. विश्वास पाटील
बालपणी गांधीजींना घरात ‘मोनिया’ म्हणून हाक मारत असत. मोहनला अंधाराची फार भीती वाटायची. बालपणी सर्वांनाच अंधाराचे भय वाटत असते. साप, चोराचिलटांची भीती वाटते. गांधीजींच्या घरात एक मोलकरीण होती. तिचे धाव होते रंभा. तिने मोहनला सांगितले, ‘मोहन, अंधाराला भिऊ नकोस. धैर्याने सामोरा जा. रामाचे नाव घे. राम जणू काही प्रकाशाची शलाका. अंधारावर मात कर.’ मग गांधीजी आयुष्यभर अंधाराशी झुंजत राहिले. अंधार मग तो अन्यायाचा असो वा अत्याचाराचा. अहंकाराचा असो वा अनीतीचा. पापाचा असो वा ढोंगाचा. नकली मोठेपणाचा असो वा पोकळ पांडित्याचा. नकाराचा असो वा नास्तिकतेचा. खरे तर अंधाराचे अस्तित्वच मुळी नसते. असतो तो प्रकाशाचा अभाव.
अंधाराविरुद्ध काय करावे लागते? लाठ्या-काठ्या हाती घेऊन काही अंधार घालवता येणार नसतो. तलवार चालवून अंधाराला पिटाळून लावता येत नसते. एक प्रकाशाचे आश्वासन जागले की संपला की हो अंधकार. एक छोटीशी मेणबत्ती जागली की, अंधार संपून जातो. एक छोटीशी दिवली मिणमिणत असली की, अंधकाराची सत्ता नेस्तनाबूत होते. मोहनच्या हे लक्षात आले. गांधीजींनी आत्मचरित्रात हे लिहून ठेवले आहे की, हे सत्य त्यांना मंदिरात कळले नाही. ते दाईने शिकविले. ती कुटुंबाची जुनी नोकर होती. तिच्या प्रेमाचे स्मरण गांधीजी करत राहिले होते. रंभेने समजावून सांगितले की, बाळा रे, रामाचे नाव घे. रामनाम हे अंधाराविरुद्धचे फार मोठे शस्त्र आहे. मोठा उपाय आहे. त्याचा आश्रय घे. बालपणी हे रामनामविषयक विचाराचे बीज रंभेने पेरले. हे प्रकाश बीज रंभेने पेरले. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत गांधीजींनी या रामनामाचा आधार घेतला. अंधाराचा मुकाबला केला. अखेरच्या क्षणी रामाचे नाव मुखात असताना त्यांनी बलिदान स्वीकारले. खरे रामभक्त दोनच आहेत. एक आहेत अंजनीनंदन हनुमान आणि दुसरे आहेत गांधीजी. एकाने छाती चिरून रामरायाचे दर्शन घडविले. दुसऱ्याची छाती चिरली गेल्यावर जगाला रामरायाचे दर्शन घडले. हे रामनामाचे बीज गांधीजींनी आपल्या छातीत मिरविले. त्याचे जतन केले. त्याचे मनाच्या भूमीत रोपण केले. श्रद्धेने जोपासना केली. श्रमाच्या घामाने ते वाढविले. त्याचा विराट वटवृक्ष झाला. त्या वडाच्या झाडाखाली वसणाºया या देशाला भयमुक्तीची दिशा कळली. दीक्षा मिळाली.