रामजन्मभूमी खटला: आठवड्यातील पाच दिवस सुनावणी घेण्यास मुस्लिम पक्षकाराचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:51 AM2019-08-10T01:51:56+5:302019-08-10T01:52:39+5:30
युक्तिवाद पूर्वतयारीला पुरेसा वेळ मिळत नाही
नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादाबाबतच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात आठवड्यातले पाच दिवस सुनावणी होत असून, त्याबद्दल एका मुस्लिम पक्षकाराने शुक्रवारी आक्षेप नोंदविला. इतक्या घाईने हा खटला चालविला जाणार असल्यास सहकार्य करणे शक्य होणार नाही असे या पक्षकाराच्या वकिलाने म्हटले आहे.
या खटल्याच्या सुनावणीच्या चौथ्या दिवशी एका मुस्लिम पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. राजीव धवन म्हणाले की, घाईगर्दीने सुनावणी होत असल्याने त्याचा काही वेळा त्रासही होत आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी व शुक्रवारी फक्त नव्या याचिकांची सुनावणी घेण्याची प्रथा आहे. मात्र, ती बाजूला सारून राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी शुक्रवारीही घेण्याचे न्यायालयाने ठरविले आहे. अॅड. धवन म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने रामजन्मभूमी खटल्याबाबत निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. त्या पहिल्या अपिलाची सुनावणी इतक्या घाईने घेण्यात येऊ नये. या खटल्यातील अनेक दस्तावेज संस्कृत, उर्दू भाषेत असून, त्यांचा अनुवाद करण्यात येतो.