रामजन्मभूमी आंदोलन; आमचा विश्वास योग्यच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 02:59 AM2020-10-01T02:59:52+5:302020-10-01T03:00:00+5:30
लालकृष्ण अडवाणी; हा आनंदाचा क्षण
नवी दिल्ली : रामजन्मभूमी आंदोलनावर भाजप व माझा असलेला विश्वास व सहभाग योग्यच होता, हे बाबरी मशीद पाडल्याच्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालातून दिसून आले, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. अडवाणी यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणाही दिली.
अडवाणी म्हणाले की, रामजन्मभूमीवर राममंदिर उभारावे या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर काही महिन्यांनी आम्हा सर्वांची निर्दोष मुक्तता केली. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे सत्य उजेडात आले असल्याने आता या सर्व प्रकरणावर पडदा पडला पाहिजे, असे माजी केंद्रीयमंत्री मुरली मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. या निकालाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, विश्व हिंदू परिषद, भाजप यांनीही स्वागत केले आहे. निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. इतर अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी समाजात सलोखा असणे आवश्यक आहे, असेही संघाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातील निकाल : काँग्रेस
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल व राज्यघटनेतील मूल्ये यांच्या विरोधात जाणारा विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरोधात केंद्र व राज्य सरकारांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागावी, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
कोणत्या जादूने मशीद पाडली? -ओवेसी
बाबरी मशीद पाडणे हा पूर्वनियोजित कट नव्हता, तर मग अशी कोणती जादू झाली होती की, ६ डिसेंबर १९९२ रोजी प्रचंड संख्येने लोक बाबरी मशिदीजवळ जमले व त्यांनी ती वास्तू पाडली, असा सवाल एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
आव्हान देणार : निकालाला उच्च न्यायालयात आव्हान
देण्यात येईल, असे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य झफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे.