काळ्या पैशावरुन राम जेठमलानींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार
By admin | Published: April 28, 2015 09:15 AM2015-04-28T09:15:05+5:302015-04-28T15:43:22+5:30
विदेशातील बँकांमध्ये दडलेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर विराजमान झालेल्या मोदी सरकारला पूर्वाश्रमीचे भाजपा नेते व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी चांगलेच धारेवर धरले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - विदेशातील बँकांमध्ये दडलेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर विराजमान झालेल्या मोदी सरकारला पूर्वाश्रमीचे भाजपा नेते व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी चांगलेच धारेवर धरले. युपीए सरकार असो किंवा मोदी सरकार काळ्या पैशाबाबत अद्याप ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही अशा शब्दात राम जेठमलांनीनी नाराजी व्यक्त केली आहे.
काळा पैसा परत आणून त्याचा वापर देशाच्या विकासासाठी करु अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात दिली. १०० दिवसांत हा पैसा परत आणू असेही त्यांनी सांगितले होते. मात्र सत्तेवर येऊन ११ महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप काळा पैसा परत येऊ शकलेला नाही. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीदेखील हा निवडणुकीतील 'जुमला' होता असे सांगितले होते. याच मुद्द्यावरुन भाजपातून हकालपट्टी झालेले राम जेठमलानी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विदेशातील बँकांमध्ये भारतातील सुमारे ९० लाख कोटी रुपयांचा काळा दडला आहे असा दावा करत जेठमलानी म्हणतात, मोदी सरकार सत्तेवर येण्यासाठी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन हे एक प्रमुख कारण होते. युपीए सरकार या मुद्द्यावर गप्प होते. पण आता मोदी सरकारही यावर गप्प आहे हे बघू दुःख होते असे जेठमलांनीनी म्हटले आहे.
जेठमलांनीनी मोदी सरकारला १३ प्रश्नही विचारले आहेत. दुहेरी कर आकारणीला आळा घालणारा कराराचा तुम्ही सखोल अभ्यास केला आहे का, भाजपाच्याच एका समितीने काळा पैशा संदर्भात २०११ मध्ये तयार केलेला अहवाल तुम्ही वाचला आहे का, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या 'जुमला' विधानावर तुमची भूमिका काय असे असंख्य सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.