अयोध्येत राम मंदिरात कोरली जातेय ‘राम कथा’; दिवाळीपूर्वी महत्त्वाची कामे होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:44 AM2023-07-10T09:44:50+5:302023-07-10T09:46:45+5:30

मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम वेगाने सुरू

'Ram Katha' is being carved in the Ram temple in Ayodhya; Important works will be completed before Diwali | अयोध्येत राम मंदिरात कोरली जातेय ‘राम कथा’; दिवाळीपूर्वी महत्त्वाची कामे होणार पूर्ण

अयोध्येत राम मंदिरात कोरली जातेय ‘राम कथा’; दिवाळीपूर्वी महत्त्वाची कामे होणार पूर्ण

googlenewsNext

नवी दिल्ली - अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात चित्रांच्या माध्यमातून वाल्मीकी रामायणाचे जतन केले जाणार आहे. वाल्मीकी रामायणातील सहा कांडातील (बाल ते लंका कांड) मुख्य ९८ श्लोक भित्तिचित्रांच्या माध्यमातून खालच्या राम चबुतऱ्यावर ‘राम कथा’ कोरली जात आहे. 

राम मंदिरातील खांब आणि इतर ठिकाणी आध्यात्मिक, पौराणिक ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या कथांच्या आधारे मूर्ती तयार केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यातील महत्त्वाच्या बांधकामांमध्ये गर्भगृह, पाच मंडप, तळमजला, खालचा चबुतरा आणि पूर्वेकडील प्रवेशद्वार यांचा समावेश आहे. वाल्मीकी रामायणातील ९८ प्रमुख श्लोकांवर आधारित ९८ भित्तिचित्रांचा समावेश असलेल्या खालच्या चबुतऱ्यावर ‘राम कथा’ कोरण्यात येत आहे. वाल्मीकी रामायणात एकूण २४,००० श्लोक आहेत.

राम मंदिरात जानेवारीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कामांनी वेग घेतला आहे. पुढील १२० दिवसांत पहिल्या टप्प्यातील महत्त्वाची कामे पूर्ण केली जात आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, श्री रामजन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. सूत्रांनी सांगितले की, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि कोषाध्यक्ष गोविंद गिरी जी महाराज यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला आमंत्रित करायचे याचा विचार करण्याची जबाबदारी या समितीला सोपविण्यात आली आहे.

रामलल्लाच्या मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे 
२०२४ मध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला रामनवमीच्या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. राम जन्माच्या वेळी दुपारी ठीक बारा वाजता सूर्याची किरणे काही काळ रामलल्लाच्या मूर्तीवर पडतील.

Web Title: 'Ram Katha' is being carved in the Ram temple in Ayodhya; Important works will be completed before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.