२२ जानेवारीला होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:53 PM2023-10-25T23:53:46+5:302023-10-25T23:54:21+5:30
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीख आता निश्चित झाली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा सहभागी होणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीख आता निश्चित झाली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा सहभागी होणार आहेत. हा सोहला दुपारी १२.३० वाजता होणार आहे. राम जन्मभूमी निर्माण समितीच्या सदस्यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या सदस्यांमध्ये चंपत राय, नृपेंद्र मिश्रा, गोविंद गिरी यांचा समावेश होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची विनंती करून त्यांना औपचारिक निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रणाचा स्वीकार केल्यानंतर ट्विट करत याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार बनण्याची संधी मिळणं हे मी माझं सौभाग्य समजतो. या पोस्टसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रस्टच्या सदस्यांसोबतचा फोटोही शेअर केला. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान, भगवान श्री रामांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे.
दरम्यान, राम जन्मभूमी ट्रस्टने सांगितले आहे की, श्री राम जन्मभूमी मंदिरामध्ये भगवान रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाईल. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीनंतर रामल्लांच्या अभिषेकाची प्रक्रिया सुरू करण्याचा आणि राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी १० दिवसांचे अनुष्ठान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये राम मंदिराची पायाभरणी केली होती. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या स्थापना सोहळ्या दिवशी सुमारे १० हजार लोकांना मंदिराच्या परिसरात येण्याची परवानगी दिली जाईल.