रामललांची दिवसातून ६ वेळा होणार आरती, सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 03:28 PM2024-01-23T15:28:03+5:302024-01-23T15:30:37+5:30

रामलला विराजमान झाल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.

Ram mandir ayodhya Aarti will be held 6 times a day how to participate | रामललांची दिवसातून ६ वेळा होणार आरती, सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या...

रामललांची दिवसातून ६ वेळा होणार आरती, सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या...

Ram Mandir Ayodhya ( Marathi News ) : अयोध्येत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या भारावून टाकणाऱ्या सोहळ्याने देशभरातील नागरिक आनंदित झाले. आपल्या मंदिरात रामलला विराजमान झाल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही राम मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आजपासून मंदिरात मोठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच आता मंदिरातील पूजा आणि आरतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राम मंदिरात प्रभू श्रीरामांची दिवसातून सहा वेळा आरती होणार आहे. सकाळी जागरण आरती होईल, तर सायंकाळी शयन आरती होणार आहे.

प्रभू श्रीरामांच्या आरतीसाठी पास देण्यात येणार आहेत. सर्वसामान्य रामभक्तांसाठी सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. सकाळी साडेसात वाजता रामभक्तांना आतमध्ये प्रवेश मिळेल. दर्शनासाठी दोन स्लॉट करण्यात आले आहेत. पहिला स्लॉट सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत असेल, तर दुसरा स्लॉट दुपारी २ पासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे.

अशी असेल आरतीची वेळ 

पहाटे ४ वाजता विशेष आरती होईल. त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे साडेचार वाजता मंगल आरतीचं आयोजन केलं जाणार आहे. या दोन्ही आरत्यांसाठी भक्तांना उपस्थित राहता येणार नाही. सकाळी साडेसहा वाजता मुख्य आरती घेण्यात येणार आहे. या आरतीला रामभक्तांना उपस्थित राहता येईल. त्यासाठी एक दिवस आधी पास घ्यावा लागेल. सायंकाळी होणाऱ्या आरतीची वेळ ही सात वाजता असेल. या आरतीसाठीचं बुकिंग दर्शनाच्या दिवशीच करता येईल. 

दरम्यान, आरतीत सामील होण्यासाठी भक्तांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पास उपलब्ध करण्यात आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या www.srjbtkshetra.org या वेबसाइटवरून ऑनलाइन पास मिळू शकेल. तर दर्शनासाठी भक्तांना कोणत्याही रजिस्ट्रेशनची गरज भासणार नाही.
 

Web Title: Ram mandir ayodhya Aarti will be held 6 times a day how to participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.