रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:38 PM2024-02-28T18:38:53+5:302024-02-28T18:39:21+5:30

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल, असा दावा केला जात आहे.

ram mandir ayodhya offerings of so many crores of rupees till today and reach near record of tirupati balaji and others temple | रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार?

रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार?

Ayodhya Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यापासून भारतासह जगभरात राम मंदिराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. तर राम मंदिरात आल्यावर भाविक सढळ हस्ते दान, देणगी देत आहेत. अल्पावधीच कोट्यवधींचे दान राम मंदिराला प्राप्त झाले आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंत तिरुपती बालाजी देवस्थानाचा विक्रम मोडला जाईल का, अशी चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. 

रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यापासून एका महिन्यात १०० कोटींपेक्षा अधिकचे दान प्राप्त झाले आहे. भाविकांनी धनादेश किंवा पावतीद्वारे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला अर्पण केलेले हे दान आहे. तर, दानपेटी आणि ऑनलाइन बँक खात्यावर पाठवलेली रक्कम वेगळी आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष  महंत गोविंद देवगिरी महाराज यांनी याबाबत सांगितले की, १९ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत ५० कोटींहून अधिक रुपये भाविकांनी दान-देणग्या दिल्या आहेत. अलीकडेच जमशेदपूर, झारखंड येथील एका कंपनीने रामललाला ११ कोटी रुपये अर्पण केले. 

राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल

तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वांत समृद्ध मानले जाते. या मंदिरात दरवर्षी भाविक सुमारे ६५० कोटींहून अधिकची देणगी देतात. म्हणजे एका महिन्यात सुमारे ५४ कोटींपेक्षा जास्त दान, देणगी मिळते, अशी माहिती आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दरवर्षी ६३० कोटींचे दान दिले जाते. जम्मूमधील श्री माता वैष्णोदेवी मंदिराला वर्षभरात ५०० कोटींच्या देणग्या मिळतात. केरळच्या त्रिवेंद्रममधील पद्मनाभस्वामी मंदिराला वर्षभरात ५०० कोटींच्या देणग्या प्राप्त होतात. एका महिन्यात राम मंदिरात मिळालेल्या देणग्या या समृद्ध मंदिरांमध्ये मिळालेल्या दानाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. असेच सुरू राहिल्यास राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल, असा दावा केला जात आहे. 

दरम्यान, प्रभू रामचंद्रांच्या भक्तांनी मुक्त हस्ते सोने-चांदीही अर्पण केले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या एका महिन्यात २५ किलो चांदी आणि १० किलो सोने भक्तांनी रामलला यांना अर्पण केले आहे. या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, हार, छत्री, रथ, बांगड्या, याशिवाय इतर वस्तूंमध्ये खेळणी, दिवे, उदबत्ती स्टँड, धनुष्यबाण यांचा समावेश आहे. भाविकांनी सोन्या-चांदीची भांडी आणि रत्न अर्पण केली आहेत.
 

Web Title: ram mandir ayodhya offerings of so many crores of rupees till today and reach near record of tirupati balaji and others temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.