राजस, सुकुमार! अयोध्येतील रामललांचं विलोभनीय रूप प्रथमच समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:12 PM2024-01-19T17:12:02+5:302024-01-19T17:12:41+5:30
Ram Mandir Ayodhya: राम मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या रामललांच्या मूर्तीचं राजस, सुकुमार विलोभनीय रूप सर्वांसमोर आलं असून, रामललांच्या या सुंदर रूपाचे फोटो आता व्हायरल होत आहेत.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकता आहे. सोमवार २२ जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठीच्या धार्मिक विधींना राम मंदिरामध्ये सुरुवात झाली आहे. तसेच रामललांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात स्थापित करण्यात आली आहे. काल ही मूर्ती गर्भगृहात स्थापित केल्यानंतर या मूर्तीचा चेहरा प्रथमच सर्वांसमोर आला आहे.
राम मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या रामललांच्या मूर्तीचं राजस, सुकुमार विलोभनीय रूप सर्वांसमोर आलं असून, रामललांच्या या सुंदर रूपाचे फोटो आता व्हायरल होत आहेत. या मूर्तीच्या डाव्या हातात धनुष्य आणि आशीर्वाद देत असलेल्या उजव्या हातात बाण आहे.
रामललांच्या मूर्तीची पायापासून ललाटेपर्यंतची उंची ही ५१ इंच एवढी आहे. तसेच मूर्तीचं वजन सुमारे २०० किलो आहे. रामललांच्या मूर्तीमागची प्रभावळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रभावळीच्या दोन्ही बााजूंना सुरुवातीला हनुमंत आणि गरुडाच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत, तर वर मध्यभागी सूर्यदेवतेची मूर्ती आहे. तर प्रभावळीर मध्ये दोन्ही बाजूला श्रीहरी विष्णूंच्या दशावतारातील अवरात कोरण्यात आले आहेत.
गुरुवारी दुपारी रामलांची ही मूर्ती गर्भगृहात वैदिक मंत्रोच्चार करत स्थापित करण्यात आली. आता या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या सोहळ्यासाठी अनेक निमंत्रित मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.