चांदीची हातोडी अन् सोन्याची छन्नी! ‘या’ खास मुहूर्तावर साकारले गेले रामललाचे डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 11:59 AM2024-01-26T11:59:51+5:302024-01-26T12:00:54+5:30
Ram Mandir Ayodhya: रामललाची मूर्ती घडताना प्रत्यक्ष तिथे असलेल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील मंदिरामध्ये रामचंद्राच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याधाममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी घडवलेल्या रामललाच्या मूर्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रामाचे राजस, सुकुमार आणि लोभस रुप सर्वांनाच आवडत आहेत. मात्र, रामललाच्या मूर्तीचे डोळे हे विशेष मुहूर्तावर घडवण्यात आले.
अयोध्येतील संस्कृती आणि संगीताचे अभ्यासक सुमधुर शास्त्री यांनी पहिल्या दिवसापासून रामललाची मूर्ती घडताना पाहिली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सुमधुर शास्त्री म्हणाले की, राम मंदिर ट्रस्टने आधीच सूचना दिल्या होत्या की, रामललाची प्रतिमा बाल स्वरूपाची असेल. यानंतर अरुण योगीराज यांनी सुमारे ८ महिन्यांत ही मूर्ती तयार केली. मूर्ती बनवण्यापूर्वी अरुण योगीराज यांनी स्वामीनारायण छपिया मंदिर आणि नैमिषारण्य मंदिराला भेट दिली. उत्तर भारतीय रूप समजून घेतले.
रामललाचे डोळे एका खास मुहूर्तावर साकारण्यात आले
रामललाचे बालरूप समजून घेण्यासाठी अरुण योगीराज यांनी अनके पुस्तके वाचली. रामायणातील श्लोकांचे पठण केले. संतांशी चर्चा केली. राममंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्याशी बोलून मार्गदर्शन घेतले. रामललाचे डोळे एका खास मुहूर्तावर साकारण्यात आले. ती कलाकुसर करण्याची पद्धत आणि परंपराही विशेष आहे. कर्मकुटीच्या विधीपूजनानंतर सोन्याच्या छन्नी आणि चांदीच्या हातोड्याने रामललाचे डोळे अगदी विशेषत्वाने साकारण्यात आले. सुमधुर शास्त्री म्हणाले की, जोपर्यंत डोळे साकारले जात नाहीत, तोपर्यंत मूर्तीचा भाव कळत नाही. आज तो दिसत आहे.
दरम्यान, प्रभू श्रीराम अखेर अयोध्येतील श्रीराम मंदिरात विराजमान झाले. श्रीरामांची संपूर्णपणे सजविण्यात आलेली मूर्ती पाहताक्षणी मन मोहून जाते. ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडविली आहे. या मूर्तीसाठी काळ्या किंवा श्यामल रंगाच्या कृष्णशिळा पाषाणाचा वापर करण्यात आला आहे.