अयोध्येतील राममंदिर २०२३ ला दर्शनास खुले, संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 08:38 AM2021-08-05T08:38:47+5:302021-08-05T08:39:16+5:30
Ram Mandir in Ayodhya: अयोध्येतील राममंदिर २०२३ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टमधील सूत्रांनी दिली. संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर २०२३ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टमधील सूत्रांनी दिली. संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार आहे.
मुख्य मंदिर तीनमजली असेल व त्यात पाच मंडप असतील. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट व प्रत्येक मजला २० फूट उंचीचा असेल. मंदिराचे काम ठरविल्यानुसार होत असून, २०२३ अखेरपर्यंत भाविक मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. मंदिर उभारणीचा काळ राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. कारण पुढील लोकसभा निवडणुका २०२४ च्या पूर्वार्धात होत आहेत. नियोजनानुसार हे काम झाले, तर देशातील सत्तारूढ भाजपला निवडणुकीपूर्वी प्रचाराचा आणखी एक मुद्दा मिळणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, मंदिरात जमिनीवर १६० खांब, पहिल्या मजल्यावर १३२ खांब व दुसऱ्या मजल्यावर ७४ खांब असतील. मंदिराच्या गर्भगृहावर होणाऱ्या शिखराची उंची जमिनीवरून १६१ फूट असेल. यासाठी राजस्थानहून आणलेले विशेष दगड व संगमरवराचा वापर करण्यात येणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, तीन दशकांत झालेले बदल व लोकांच्या अपेक्षेनुसार बदल करून मंदिराच्या आराखड्याला अंतिम रूप दिलेले आहे.