…म्हणून लालकृष्ण अडवाणींना भूमीपूजनाला बोलावलं नाही; राम मंदिर ट्रस्टने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 07:23 PM2020-08-03T19:23:55+5:302020-08-03T19:27:12+5:30
लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जय्यत सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमीपूजन पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अवघे ४८ तास उरले आहेत. भूमीपूजन सोहळ्यासाठी २०० लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहेत. मात्र आमंत्रणाच्या यादीत राम मंदिरासाठी रथ यात्रा काढणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नाव नाही.
लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. संत महात्मा मिळून १७५ जण सहभागी असणार आहेत. पद्मश्री मिळालेले फैजाबादचे मोहम्मद युनूस खान यांनाही आमंत्रण दिलं आहे. युनूस खान हे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करतात, मृतदेह कोणत्याही धर्माचा असला तरी विधिवत अंत्यसंस्कार करतात.
लालकृष्ण अडवाणी यांना फोन करुन वैयक्तिक माफी मागण्यात आली आहे. त्यांचे वय लक्षात घेता ९० वर्षीय व्यक्ती सोहळ्याला कशी उपस्थिती लावणार असा प्रश्न होता. कल्याण सिंह यांचेही वय जास्त आहे, गर्दीच्या ठिकाणी त्यांनी येऊ नये असं सांगितले त्यांनीही होकार दिला असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चम्पत राय यांनी सांगितले.
लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या पर्यंत रथयात्रेची सुरुवात केली होती. मात्र, बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांना समस्तीपूर जिल्ह्यात अटक केली. आरोपपत्रानुसार ६ डिसेंबर १९९२ रोजी अडवाणी म्हणाले होते की, “आज कारसेवेचा शेवटचा दिवस आहे”. अडवाणींवर मशीद पाडण्याच्या कट रचल्याबद्दल अद्याप गुन्हेगारी खटला चालू आहे.
कल्याण सिंह ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ही ती तारीख आहे ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली. त्यांच्यावर पोलीस आणि प्रशासनाने कारसेवकांना मुद्दाम रोखले नाही असा आरोप आहे. नंतर कल्याण सिंह यांनी भाजपापासून दूर जाऊन नॅशनल रेव्होल्यूशन पार्टी स्थापन केली पण ते पुन्हा भाजपामध्ये परतले. मशीद पाडण्याच्या षडयंत्र रचल्याचा आरोप असलेल्या १३ लोकांपैकी कल्याण सिंह यांचे नाव होते.