श्रीराम मंदिरात भाविकांनी केले कोट्यवधींचे दान; लाखो भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 07:28 PM2024-01-30T19:28:13+5:302024-01-30T19:28:34+5:30
23 जानेवारी रोजी सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले झाल्यानंतर दररोज लाखो भाविक येत आहेत.
Ram Mandir Donation: अयोध्येत भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात पार पडली. 22 जानेवारी रोजी रामललाचा अभिषेक झाल्यानंतर 23 जानेवारी 2024 पासून राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच भाविक खुल्या मनाने दान करत आहेत. आतापर्यंत राम मंदिरात कोट्यवधी रुपयांचे दान आले आहे.
सहा दिवसांत 19 लाख भाविक आले
राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत सुमारे 19 लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून, ही संख्या सातत्याने वाढत आहे. दररोज लाखोच्या संख्येने भाविक रामललाचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी येत आहेत. अनेक भाविक सोन्या-चांदिच्या मौल्यवान वस्तू मंदिरासाठी दान करत आहेत.
किती दान आले?
मिळालेल्या माहितीनुार, 22 जानेवारी रोजी मंदिरात 2 लाख रुपयांचा धनादेश आणि 6 लाख रुपये रोख दान आले. यानंतर, 23 तारखेला 2.62 कोटी रुपयांचे धनादेश, 27 लाख रोख, 24 जानेवारीला 15 लाख रुपयांचे धनादेश आणि रोख, 25 जानेवारीला 40 हजार रुपयांचा धनादेश अन् 8 लाख रुपये रोख, 26 जानेवारीला 1,04,60,000 रुपयांचे धनादेश अन् 5.50 लाख रुपये रोख, 27 जानेवारीला 13 लाखांचे धनादेश अन् 8 लाख रुपये रोख, 28 जानेवारीला 12 लाखांचे धनादेश आणि रोख, 29 जानेवारीला 7 लाख रुपयांचा धनादेश अन् 5 लाख रुपये रोख दान आले आहे. या आकडेवारीनुसार राम मंदिरासाठी येणारे दान हे दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या दानापेक्षा वेगळे आहे. एका अंदाजानुसार, दानपेटीत दररोज 3 लाख रुपयांची देणगी टाकली जात आहे.