२०२४ साठी भाजपकडून राममंदिर, आक्रमक हिंदुत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:56 AM2023-01-07T09:56:17+5:302023-01-07T09:56:43+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकारणातील चाणक्य मानले जाते. ते राजकीय खेळी खेळण्यात मातब्बर आहेत.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : भाजपने २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा अजेंडा आधीच निश्चित केला आहे. अयोध्येतील भव्य राममंदिराची उभारणी व हिंदुत्वाशी संबंधित मुद्दे घेऊन पक्ष जनतेसमोर आक्रमकपणे जाणार आहे. यात समान नागरी कायदा ते लव्ह जिहाद, हिजाब, मथुरा, काशीपासून लोकसंख्या नियंत्रण कायदा या मुद्द्यांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकारणातील चाणक्य मानले जाते. ते राजकीय खेळी खेळण्यात मातब्बर आहेत. त्यांनी त्रिपुरामधून अयोध्येतील राममंदिराच्या तारखेची घोषणा केली, तेव्हाच स्पष्ट झाले की, २०२४च्या निवडणुकीसाठी भाजपचा अजेंडा निश्चित झाला आहे व भाजप २०२४मध्ये आक्रमक हिंदुत्वासह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
यंदा २०२३मध्ये होणाऱ्या नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतही याची झलक पाहण्यास मिळू शकते. त्रिपुरात राममंदिराच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जाऊ शकतात; तर कर्नाटकात भाजप लव्ह जिहाद, हिजाब व हलाल मीटच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवील. राजस्थानमध्ये मंदिराची तोडफोड, गायींच्या तस्करीपासून तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवील.
संघाचा दबाव
भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी मोदी सरकारवर सर्वांत जास्त दबाव संघाकडून असून, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही विविध व्यासपीठांवरून हा कायदा लवकरात लवकर आणण्याबाबत विधाने केलेली आहे.