सरकार कोणाचंही आलं तरी राम मंदिर होणारच- भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 08:17 AM2019-02-06T08:17:15+5:302019-02-06T08:19:33+5:30
राम मंदिराबद्दल मोहन भागवत यांचं महत्त्वपूर्ण विधान
देहरादून: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. 2014 मध्ये राम मंदिराचा मुद्दा नव्हता. तेव्हा राम मंदिराचा मुद्दा नसता, तरीही सरकार स्थापन झालं असतं. मात्र 2019 मध्ये भाजपा राम मंदिर सर्वात महत्त्वाचा विषय आहे, असं भागवत यांनी म्हटलं. ते देहरादूनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
2014 मध्ये देशात एक दुसरी लाट होती. ती राम मंदिरापेक्षा वेगळी होती. मात्र यावेळी राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. भगवान राम आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहेत. सरकार कोणाचंही येवो, राम मंदिराची उभारणी व्हायलाच हवी. असं न झाल्यास संतांशी चर्चा करुन आम्ही योग्य ती कार्यवाही करु, असं सूचक विधान सरसंघचालकांनी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,' असं भागवत म्हणाले. नितीन गडकरींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विधानं केली आहेत. लोकांनी दाखवलेली स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, तर लोक धुलाई करतात, असं गडकरींनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी गडकरींचा निशाणा पंतप्रधान मोदींवर असल्याची चर्चा झाली होती.
मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिकादेखील स्पष्ट केली. मी कायम आरक्षणाच्या बाजूनं आहे. मात्र आरक्षण जाती आणि धर्माच्या आधारे न देता ते गरजूंना द्यायला हवं, असं भागवत म्हणाले. आरक्षणामागचं राजकारण मुख्य समस्या असल्याचंही त्यांनी म्हटलं. याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीवेळी भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यावेळी संघाला आरक्षण संपवायचं आहे, असा प्रचार जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी केला होता. याचा मोठा फटका भाजपाला निवडणुकीत बसला अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.