अयोध्येतील राम मंदिर टार्गेटवर, देशातील ATM सेंटर्स उडवण्याचा जैश ए मोहंमदचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:51 AM2023-01-24T06:51:08+5:302023-01-24T06:51:34+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याची जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने जय्यत तयारी केली
आशिष सिंह
मुंबई :
प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याची जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने जय्यत तयारी केली असून, त्यात अयोध्येतील राम मंदिरही लक्ष्य करण्याचा कटही समाविष्ट असल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर विभागाच्या हाती आली आहे. या संदर्भातील अहवालाची कागदपत्रेच ‘लोकमत’च्या हाती आली आहेत. या पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणांसह सज्ज राहण्याच्या सूचना गुप्तचर विभागाने दिल्या आहेत.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार जैश ए मोहंमदचे दहशतवादी नेपाळमार्गे उत्तर प्रदेशात दाखल होऊन राम मंदिरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा कट अयशस्वी झाला तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, राजस्थानमधील कोणत्याही इतर मोठ्या राम मंदिरावर हल्ले करून जातीय तणाव निर्माण करण्याच्या सूचनाही या संघटनेच्या दहशतवाद्यांना देण्यात आल्या आहेत.
एटीएमही लक्ष्य
बहुसंख्य एटीएमवर सुरक्षा नसल्याने या ठिकाणी गॅसोलीनचा वापर करीत स्फोट घडवून आणावेत. रोख रक्कम जळून खाक होईल. असे लहान स्फोट घडवल्याने येथील आर्थिक व्यवस्था खिळखिळी होईल, अशाही सूचना दहशतवाद्यांना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
गुप्तचर विभागाने पुरविलेल्या या माहितीनंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रम वगळता प्रार्थनास्थळांबाहेरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून, कोणतीही आपत्कालीन स्थिती हाताळण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी मॉक ड्रीलही घेण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
संदेश वहनासाठी प्राेग्रॅमिंग आणि कोडिंग शिकण्याच्या सूचना
- गेल्या काही दिवसात काही खासगी इन्क्रिप्टेड रॉकेट चॅट पकडले असता ते तपासल्यावर ही धक्कादायक माहिती गुप्तचर विभागाच्या हाती आली आहे. त्या चॅटमध्ये दहशतवाद्यांनी प्राेग्रॅमिंग आणि कोडिंगची पद्धती शिकून घ्यावी. आपल्या लढाईत संदेश वहनाचे हे एकमात्र साधन असेल असेही त्या चॅटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
- २०२२ साली देशात याच पद्धतीने तब्बल ९४ दंगली घडवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता २०२३ मध्येही मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली घडविण्याची ‘जैश ए मोहंमद’ची योजना आहे.