'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 09:50 PM2024-01-12T21:50:38+5:302024-01-12T21:52:22+5:30
रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी काय म्हणाले, पाहा...
Ram Mandir Inauguration: अयोध्येत येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाचा प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) सोहळा होत आहे. तत्पुर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनाची ज्वाला पेटवणारे लालकृष्ण अडवाणी (Lal Krish Advani) यांचे महत्त्वपूर्ण विधान समोर आले आहे. या सोहळ्यांना त्यांनी दिव्य स्वप्नाची पूर्तता म्हटले आणि रामललाच्या अभिषेकाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असल्याचेही सांगितले.
लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनी राष्ट्रधर्म या हिंदी मासिकाशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी भव्य राम मंदिर बांधल्याबद्दल आणि हा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले. यावेळी अडवाणी यांनी त्यांच्या रथयात्रेचाही उल्लेख केला आहे. अडवाणी म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे नियतीनेच ठरवले होते. रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मला समजले की मी फक्त एक सारथी आहे. हा रथ स्वतःच रथयात्रेचा मुख्य संदेशवाहक आहे.
पंतप्रधान मोदींचे आभार मानले
दरम्यान, अडवाणी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली आणि प्राण प्रतिष्ठाच्या भव्य कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती जाणवत असल्याचे सांगितले. जुन्या काळाची आठवण करुन अडवाणी म्हणाले की, आज रथयात्रेला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रेला सुरुवात करताना वाटले नव्हते की, ही यात्रा देशव्यापी चळवळीचे रुप घेईल. विशेष म्हणजे, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अडवाणींचे सहाय्यक होते आणि संपूर्ण रथयात्रेत सोबत राहिले.
रथयात्रेद्वारे देशभरात फिरत होतो, तेव्हा अनेक लोक मला भेटायचे. तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला राम मंदिराचे स्वप्न दिसायचे. त्यांनी अनेक वर्षे आपल्या इच्छा मनात दाबू ठेवल्या होत्या. आता 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होत आहे आणि यातून देशातील लाखो करोडो रामभक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललाच अभिषेक करतील, तेव्हा ते भारतातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील. मी प्रार्थना करतो की हे मंदिर सर्व भारतीयांना श्रीरामाचे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देईल, असं अडवणी यावेळी म्हणाले.
लालकृष्ण अडवणींची रथयात्रा
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांनी आपल्या रथयात्रेतून राम मंदिर आंदोलनाची ज्योत पेटवली. 25 सप्टेंबर 1990 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सोमनाथ ते अयोध्येपर्यंत 10 राज्यांतून निघालेल्या अडवाणींच्या यात्रेने लोकांमध्ये राम मंदिराचे बीज पेरले होते. 10 हजार किलोमीटरच्या या रथयात्रेने देशातील लोकांमध्ये लपलेले हिंदुत्व जागृत केले. आज त्या रथयात्रेचे फळ देशातील करोडो राम भक्तांना मिळत आहे.