तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 04:57 PM2024-01-21T16:57:17+5:302024-01-21T16:57:40+5:30

एकीकडे श्रीराम मंदिराचा सोहळा जवळ आला आहे, तर दुसीरकडे राजकारण तापले आहे.

ram-mandir-inauguration-nirmala-sitharaman-claims-tamil-nadu-govt-banned-live-telecast-of-ayodhya-pranpratishtha | तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप

तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप

Ram Mandir Inauguration : श्रीराम जन्मभुमी अयोध्येत होणाऱ्या भव्य सोहळ्याची देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा LIVE दाखवला जाणार आहे. पण, या मुद्द्यावरुन राजकारणही तीव्र झाले आहे. विरोधकांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर मोठा आरोप केला आहे. तामिळनाडू सरकारने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातल्याचा आरोप अर्थमंत्र्यांनी केला आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सीतारामन यांनी लिहिले की, 'तामिळनाडू सरकारने 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यास बंदी घातली आहे. तामिळनाडूमध्ये श्रीरामाची 200 हून अधिक मंदिरे आहेत. तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग (HR&CE) द्वारे व्यवस्थापन होणाऱ्या या मंदिरांमध्ये श्रीरामाच्या नावाने पूजा/भजन/प्रसाद वाटप/अन्नदानाला परवानगी नाही. खासगी मंदिरांनाही कार्यक्रम आयोजित करण्यापासून पोलीस रोखत आहेत. मंडप पाडू, अशी धमकी आयोजकांना देत आहेत. या हिंदुद्वेषी, घृणास्पद कृतीचा मी तीव्र निषेध करते.'

त्या पुढे म्हणतात, 'तामिळनाडूच्या अनेक भागातून धक्कादायक दृश्ये पाहायला मिळत आहेत. लोकांना भजन आयोजित करण्यापासून, गरिबांना जेवण देण्यापासून, मिठाई वाटण्यापासून, उत्सव करण्यापासून रोखले जात आहे आणि धमकावले जात आहे. अनेकांना पंतप्रधान मोदींना आणि अयोध्येतील सोहळ्याला पाहायचे आहे. पण, लाइव्ह टेलिकास्टदरम्यान वीज खंडित होण्याची शक्यता असल्याचे केबल टीव्ही ऑपरेटर्सना सांगण्यात आले आहे. I.N.D.I आघाडीतील DMK ची ही हिंदुविरोधी चाल आहे.'

'तामिळनाडू सरकार थेट प्रसारण बंदीचे समर्थन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करत आहे. ही साफ खोटे आहे. अयोध्या निकालाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पंतप्रधान मोदींनी ज्या दिवशी राम मंदिराची पायाभरणी केली, त्या दिवशीही ही समस्या उद्धभवली नाही. तामिळनाडूमध्ये प्रभू श्रीरामाचा अभिषेक उत्सव साजरा करण्यासाठी लोकांमध्ये जो उत्साह संचारला आहे, त्यामुळे हिंदुद्वेषी द्रमुक सरकार प्रचंड अस्वस्थ झाले आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्र्यांने आरोप फेटाळले
दरम्यान, राज्य सरकारमधील शेखर बाबू यांनी अर्थमंत्र्यांच्या विधानाचे खंडन केले आहे. त्यांनी लिहिले की, 'डीएमकेच्या युवा विंगच्या परिषदेवरुन लक्ष हटवण्यासाठी या अफवा पसरवल्या जात आहेत. तामिळनाडूमधील कोणत्याही मंदिरात पूजा करण्यास किंवा रामासाठी अन्नदान करण्यावर कोणतीही बंदी घातली नाही. निर्मला सीतारामन यांच्यासारखे लोक अफवा पसरवत आहेत,' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

Web Title: ram-mandir-inauguration-nirmala-sitharaman-claims-tamil-nadu-govt-banned-live-telecast-of-ayodhya-pranpratishtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.