Ram Mandir Inauguration: ७०० किमी पायी प्रवास! जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:58 PM2024-01-21T20:58:03+5:302024-01-21T20:58:46+5:30
२२ जानेवारी २०२४ हा दिवस तमाम भारतावासियांसाठी खास आहे.
नवी दिल्ली: २२ जानेवारी २०२४ हा दिवस तमाम भारतावासियांसाठी खास आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत २२ जानेवारीला रामललाच्या भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला भव्य राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आता भाजपा नेते बाबा बालकनाथ यांनी राम मंदिराबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा आमदार बाबा कमलनाथ हे जयपूरहून चालत अयोध्येला पोहचले आहेत. त्यांनी सांगितले की, संपूर्ण देश भक्तीमय आहे, संपूर्ण देश राममय झाला आहे. मी राजस्थानमधील जयपूरहून अयोध्येला पायी चालत आलो आहे. आज अयोध्येत रामभक्तांचा मेळा दिसत आहे. अगदी हेच सर्व ठिकाणी, मंदिरात, गावात, शहरात आणि संपूर्ण भारतात दिसते आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. खरं तर जयपूर ते अयोध्या हे ७०० किलोमीटरचे अंतर पायी चालत बालकनाथ यांनी रामललाच्या भव्य मंदिरात प्रवेश केला.
७०० किमी पायी प्रवास
तब्बल ५०० वर्षांनंतर रामलला अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच संपूर्ण अयोध्या शहराला आकर्षक रोषणाई करून सजवण्यात आले आहे. कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून, तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
कोण आहेत बाबा बालकनाथ?
बाबा बालकनाथ यांचा जन्म १६ एप्रिल १९८४ रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. बालकनाथ हे अलवरचे खासदार राहिले आहेत. भाजपाने त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बाबा बालकनाथ योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घालतात. त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी म्हणतात. बाबा बालकनाथ यांची अलवर आणि आसपासच्या परिसरात मजबूत पकड आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी विजय संपादन केला. ते भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला फिट बसतात. निवडणुकीपूर्वी भाजपाने राजस्थानमध्ये आपल्या युनिटची घोषणा केली, तेव्हा त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले.