श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:45 PM2024-01-19T18:45:08+5:302024-01-19T18:46:52+5:30
अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून, अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवली जात आहेत.
नवी दिल्ली: श्रीराम जन्मभुमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रिष्ठेची तयारी पूर्ण झाली आहे. तीन दिवसानंतर प्रभू राम आपल्या आसनावर विराजमान होतील. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी हजारो मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचाही समावेश आहे.
न्यायाधीशांना निमंत्रण मिळाले
पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राम मंद-बाबरी मशीद प्रकरणावर ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांव्यतिरिक्त, माजी सरन्यायाधीश, न्यायाधीश आणि प्रमुख वकीलांसह न्याय क्षेत्राशी संबंधित 50 हून अधिक व्यक्तींना 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
कोणत्या न्यायमूर्तींनी निकाल दिला?
9 नोव्हेंबर 2019 रोजी तत्कालीन CJI रंजन गोगोई, माजी CJI एसए बोबडे, वर्तमान CJI डीवाय चंद्रचूड, माजी न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय खंडपीठाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच, मुस्लिम पक्षकारांना पाच एकर पर्यायी जमीन देण्याचे आदेश सरकारला दिले होते.
निकाल देणारे न्यायाधीश आता कुठे आहेत?
माजी CJI रंजन गोगोई हे सध्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले राज्यसभेचे खासदार आहेत. न्यायमूर्ती एसए बोबडे हे 18 नोव्हेंबर 2019 ते 23 एप्रिल 2021 पर्यंत भारताचे 47 वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती अशोक भूषण जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर सध्या आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत.