पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर हे असतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:41 PM2024-01-16T22:41:57+5:302024-01-16T23:06:19+5:30
Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रमुख यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील अशी माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र हे या सोहळ्याचे मुख्य यजमान असतील.
येत्या सोमवारी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे सोहळ्याबाबत हिंदू धर्मातील अनेकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तर मंदिर अपूर्ण असताना होणारी प्राणप्रतिष्ठापना आणि पौष महिन्यातील तिथी यावरून टीका होत आहे. तर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यजमानपदी सोहळा होत असल्यानेही टीका केली आहे. दरम्यान, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रमुख यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील अशी माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र हे या सोहळ्याचे मुख्य यजमान असतील. या सोहळ्याचे यजमान म्हणून त्यांनी मंगळवारी प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे सात दिवस ते यजमानाच्या भूमिकेत असतील.
प्राणप्रतिष्ठापना करणारे कर्मकांडी ब्राह्मण आणि मुहूर्तकाकरांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत आणि डॉ. अनिल मिश्र हे त्यांच्या पत्नीसह मुख्य सोहळ्यावेळी गर्भगृहामध्ये उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गर्भगृहामध्ये आपल्या हातांनी कुशा आणि श्लाका खेचतील. त्यानंतर रामललांची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. त्या दिवशी पंतप्रधान मोदी रामललांना नैवैद्य अर्पण करतील. तसेच आरतीही करतील.
मंगळवारी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येतील विवेक सृष्टी आश्रमामध्ये अनुष्ठानास प्रारंभ झाला आहे. काशीच्या पंडितांनी शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान डॉ. अनिल मिश्रा आणि मूर्ती घडवणारे अरुण योगीराज तिथे उपस्थित होते. हे अनुष्ठान २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
रामललांची मूर्ती १८ जानेवारी रोजी गर्भगृहामध्ये निर्धारित आसनावर स्थापित केली जाणार आहे. तसेच मागच्या ७० वर्षांपासून पूजन होत असलेली मूर्तीसुद्धा नव्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये दुपारी १२.२० रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मुख्य अनुष्ठानास प्रारंभ होणार आहे. ही पूजा सुमारे ४० मिनिटे चालणार आहे.