Ram Mandir: ३० वर्ष रामललासाठी 'मौन'! २२ तारखेला व्रत मोडणार; आवाज ऐकण्यासाठी कुटुंब आतुर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 08:30 PM2024-01-07T20:30:31+5:302024-01-07T20:30:59+5:30
ram mandir ayodhya photo: २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे.
२२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. देशभरात असे अनेक भक्त आहेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राम मंदिराच्या उभारणीसाठी व्रत केले आहे. अशीच एक रामभक्त म्हणजे झारखंडमधील सरस्वती देवी... धनबादच्या कर्मतांड येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय सरस्वती देवी यांचा आनंद गगणात न मावणारा आहे.
सरस्वती देवी या ३० वर्षांहून अधिक काळ राम मंदिराच्या उभारणीसाठी मौन उपोषण करत आहेत. यासोबत त्यांनी मंदिर बांधल्यानंतरच मौनव्रत सोडणार असल्याची शपथ घेतली आहे. सरस्वती देवी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विविध तीर्थक्षेत्रांमध्ये नवस देखील केले आहेत. त्यांचे कुटुंब मागील ३० वर्षांपासून त्यांच्या आईचा आवाज ऐकण्यासाठी तळमळत आहे. मात्र, आता मंदिर बांधल्यानंतर त्यात बसलेल्या रामललाला पाहून सरस्वती देवी आपले मौन सोडणार आहेत.
३० वर्ष रामललासाठी 'मौन'!
मागील ३० वर्षांपासून सरस्वती देवी त्यांच्या कुटुंबीयांशी हातवारे करूनच बोलत आहेत. त्यांचा मुलगा हरिराम अग्रवाल सांगतो की, आई अनेकदा रामजन्मभूमीचे अध्यक्ष नित्य गोपाल दास यांना भेटायला जायची. तिने चित्रकूटमधील कल्पवासातही मुक्काम केला आहे. तिने तिचे आयुष्य बहुतेक तीर्थक्षेत्रांमध्ये घालवले. आता राम मंदिराच्या अभिषेकची बातमी कानावर पडताच तिला खूप आनंद झाला.
दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. राम मंदिरात मूर्ती स्थापनेची वेळ १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद अशी असेल. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त फक्त ८४ सेकंदांचा असणार आहे.