Ram Mandir: भोवती आकर्षक प्रभावळ, पायाखाली कमळ, अशी आहे अयोध्येतील रामललांची मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:42 AM2024-01-19T00:42:14+5:302024-01-19T00:43:08+5:30
Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी रामललांची मूर्ती मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आली आहे. या मूर्तीच्या चेहरा सध्या पिवळ्या रुमालाने झाकून ठेवण्यात आला आहे. मात्र या मूर्तीचा एक फोटो समोर आला आहे.
अयोध्येतील राममंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी रामललांची मूर्ती मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आली आहे. या मूर्तीच्या चेहरा सध्या पिवळ्या रुमालाने झाकून ठेवण्यात आला आहे. मात्र या मूर्तीचा एक फोटो समोर आला असून, त्यामधून या मूर्तीच्या रूपाचा अंदाज येत आहे. मंदिरात स्थापित करण्यात येणारी रामललांची मूर्ती ही उभ्या स्वरूपात असून, तिच्या पायाखाली कमळ आहे. तसेच भोवती सुंदर कलाकुसर केलेली प्रभावळ आहे. या प्रभावळीवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणारी रामललांची मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. ५१ इंच उंचीची ५ वर्षांच्या बालकाच्या स्वरूपातील ही मूर्ती बुधवारी रात्री मंदिरात आणण्यात आली होती.
गुरुवारी दुपारी ही मूर्ती गर्भगृहात वैदिक मंत्रोच्चार करत स्थापित करण्यात आली. आता या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या सोहळ्यासाठी अनेक निमंत्रित मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.