स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण- लालकृष्ण अडवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:42 AM2024-01-21T08:42:55+5:302024-01-21T09:06:30+5:30
श्री रामांच्या जन्मस्थळी अयोध्येत एक भव्य श्रीराम मंदिर उभे करणे हे माझे सर्वांत प्रिय असे स्वप्न होते.
-लालकृष्ण अडवाणी, माजी उपपंतप्रधान
श्री रामांच्या जन्मस्थळी अयोध्येत एक भव्य श्रीराम मंदिर उभे करणे हे माझे सर्वांत प्रिय असे स्वप्न होते; माझ्या डोळ्यांदेखत ते साकार झालेले दिसते आहे, याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणे कठीण आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या येथील दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार मी होऊ शकलो, याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. एक सार्थक जीवन आणि समाज अशा दोन्हीचा पाया हा श्रद्धेवर उभा असतो, असे मी नेहमीच मानत आलो. श्रद्धेमुळे माणसाच्या जीवनात केवळ ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होतो, श्रद्धा माणसाच्या आयुष्याला दिशा देते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी भारतीयांसाठी श्रीराम हा प्रगाढ श्रद्धेचा विषय आहे. म्हणूनच अयोध्येत श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण व्हावे, अशी इच्छा गेल्या पाचेकशे वर्षांपासून कोट्यवधी भारतीय बाळगत आले आहेत.
अयोध्येत श्रीरामांच्या जन्मभूमीवर पुन्हा मंदिर उभारण्यासाठी केले गेलेले राम जन्मभूमी आंदोलन देशाच्या १९४७ नंतरच्या इतिहासातली एक निर्णायक आणि परिणामकारी घटना ठरली. आपला समाज, राजकारण तसेच समाजमनावर या आंदोलनाचा खोल प्रभाव उमटला. माझ्या राजकीय प्रवासात श्रीरामजन्मभूमी आंदोलन ही सर्वाधिक निर्णायक, परिवर्तनकारी घटना होती. या घटनेने मला भारत-शोधाची एक अपूर्व संधी दिली. १९९० मध्ये सोमनाथपासून अयोध्येपर्यंत श्रीरामाची रथयात्रा काढण्याचे पुण्यकर्म नियतीनेच माझ्यासाठी लिहिलेले होते. श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामांचे एक भव्य मंदिर उभे राहावे ही भारतीय जनता पक्षाची प्रबळ इच्छा आणि संकल्प होता. १९८० च्या दशकाच्या मध्यावर अयोध्येचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला.
भाजपचा अध्यक्ष या नात्याने अयोध्या आंदोलनासाठी जनसमर्थन मिळविण्यासाठी श्रीराम रथयात्रेचे नेतृत्व मी करावे, असा निर्णय १९९० साली जेव्हा पक्षाने घेतला तेव्हा मी स्वाभाविकपणे या ऐतिहासिक यात्रेच्या प्रारंभासाठी सोमनाथची निवड केली. यात्रा २५ सप्टेंबरला सोमनाथमधून निघून ३० ऑक्टोबरला अयोध्या नगरीत पोहोचणार होती. आंदोलनाशी जोडलेल्या संतांच्या योजनेनुसार कार सेवा केली जाणार होती. २५ सप्टेंबरच्या सकाळी मी सोमनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगाची पूजा - अर्चना केली. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (जे त्यावेळी भाजपचे एक गुणी नेता होते.), पक्षाचे सरचिटणीस प्रमोद महाजन, पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि माझे कुटुंबीय त्या वेळी उपस्थित होते. राजमाता विजयाराजे शिंदे आणि सिकंदर बख्त रथाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आले होते. ‘जय श्रीराम’ आणि ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनाएंगे’ या गगनभेदी घोषणांच्या गजरात श्रीराम रथ पुढे सरकला. पुढे या घोषणा यात्रेची ओळख झाल्या.
ज्या भागातून यात्रा गेली तेथे लोकांनी भव्य कमानी उभारून तोरणे लावली होती. पुष्पवर्षावात रथाचे स्वागत होत होते. लवकरच माझ्या लक्षात आले की, अनेक लोकांसाठी या अभियानाच्या दृष्टीने मी इतका महत्त्वाचा नव्हतोच. मी तर केवळ एक सारथी होतो. रथयात्रेचा प्रमुख संदेशवाहक खुद्द तो रथच होता आणि तो श्रीराम मंदिराच्या निर्माणाचा पवित्र उद्देश बाळगून अयोध्येकडे जात होता, म्हणून त्याची पूजा केली जात होती. धार्मिक गोष्टींच्या माध्यमातून राष्ट्रवादाचा संदेश द्यायचा असेल तर मी तो या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकेन, हे मला या रथयात्रेने सांगितले. धार्मिक श्रद्धेबद्दल सकारात्मक दृष्टिकोनाची शक्ती सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र निर्माणात महत्त्वाचे योगदान देऊ शकते हा मुद्दा मी माझ्या भाषणात वारंवार मांडला. मुस्लिम बांधवांना स्वतंत्र भारतात समानता प्राप्त झाली यावर मी भर दिला. हिंदूंच्या भावनांचा आदर करा, असे आवाहन मी अयोध्येविषयी बोलताना मुस्लिम समुदायाच्या नेत्यांना करीत असे. आंदोलनाला एकीकडे लोकांचे मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले होते; तर दुसरीकडे बहुतेक राजकीय पक्ष मात्र चाचरत होते. कारण त्यांना मुस्लिम मते गमावण्याची भीती होती. मतपेढीच्या लोभात ते अडकले आणि त्यालाच धर्मनिरपेक्षता म्हणू लागले.
श्रीराम रथयात्रेला ३० वर्षे झाली आहेत. आता भव्य श्रीराम मंदिर निर्माणाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे; अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार, सर्व संघटना, विशेषत: विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, रथ यात्रेतील अगणित सह प्रवासी, संत मंडळी, नेते, कारसेवक यांच्याबद्दल माझ्या अंत:करणात कृतज्ञता दाटून आली आहे. २२ जानेवारी २०२४ ला विशेष सोहळा संपन्न होईल. केवळ संघ आणि भाजपचा एक सदस्य म्हणून नव्हे, तर आपल्या गौरवशाली मातृभूमीचा एक अभिमानी नागरिक म्हणूनही हा समाधानाचा क्षण आहे. पंतप्रधान जेव्हा अयोध्येत श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील तेंव्हा ते आपल्या महान भारतवर्षातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करीत असतील. हे मंदिर सर्व भारतीयांना श्रीरामांचे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देईल, असा दृढ विश्वास आणि आशा मी बाळगतो आणि श्रीरामांच्या चरणकमलांवर मस्तक ठेवतो. आपल्याला सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा. जय श्रीराम!