राम मंदिराला मिळणार तांत्रिक सुरक्षा कवच; सीआयएसएफकडे जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:46 AM2023-07-08T07:46:29+5:302023-07-08T07:46:37+5:30
रामजन्मभूमी संकुलाला जास्तीत जास्त तांत्रिक सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी सीआयएसएफ धोरण तयार करेल.
अयोध्या : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी सुरक्षा आराखडा तयार करण्याचे काम केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपवण्यात आले आहे. सीआयएसएफचा सल्लागार विभाग योजना तयार करेल आणि पुढील वर्षी जानेवारीमध्ये मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सुरक्षा यंत्रणा सज्ज होणार आहे.
रामजन्मभूमी संकुलाला जास्तीत जास्त तांत्रिक सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी सीआयएसएफ धोरण तयार करेल. यामध्ये ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा समावेश असू शकतो. त्यामुळे सुरक्षा अत्यंत कडक असेल. रामजन्मभूमीची सुरक्षा सध्या सीआरपीएफ, पीएसी आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून हाताळली जात आहे.
गर्भगृहाचे रक्षण सीआरपीएफकडून होते, तर बाहेरील गार्ड पोलिसांचे असतात. राम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यासाठी गेल्यावर्षी सीआयएसएफकडून संरक्षण आढावा घेण्यात आला. सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी अलीकडेच मंदिराच्या त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. भाविकांच्या ये-जा करण्यासाठीचा मार्ग आणि बॅग स्कॅनर बसविण्याच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या अपेक्षांबाबत चर्चा करण्यात आली.
‘सीआयएसएफ’च का?
सीआयएसएफ ऐतिहासिक इमारती तसेच विमानतळ, मेट्रो रेल्वे आणि मोठ्या औद्योगिक आस्थापनांचे रक्षण करण्यात तरबेज आहे. या दलाचे तंत्रज्ञान अत्यंत आधुनिक मानले जाते. त्याचा अनुभव राम मंदिराच्या सुरक्षेसाठी वापरला जात आहे.