Ram Mandir : "२२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका...", राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 02:08 PM2023-12-17T14:08:31+5:302023-12-17T14:08:47+5:30

नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे.

ram mandir udghatan Citizens should not come to Ayodhya on January 22 to avoid crowding, said Champat Rai, secretary of Ram Mandir Trust | Ram Mandir : "२२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका...", राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन

Ram Mandir : "२२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका...", राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन

Ram Mandir Ayodhya | अयोध्या : नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गर्भगृहात स्थापित केलेली रामललाची मूर्ती पाहण्यासाठी लाखो भाविक अयोध्येत येण्याची अपेक्षा आहे. अशातच राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी भव्य सोहळ्याची माहिती देताना, २२ तारखेला अयोध्येत न येण्याची विनंती केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा २२ जानेवारीला दुपारी १२ वाजता होणार आहे. मूर्तीप्रमाणेच गर्भगृहही तयार आहे, मात्र संपूर्ण मंदिराच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागू शकतात, असेही ते म्हणाले.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विविध राज्यांतील अनेक लोक अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. मात्र, ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी या काळात भाविकांना अयोध्येत न येण्यास सांगितले आहे. "२२ जानेवारीला अयोध्येत येण्याऐवजी तुमच्या जवळच्या मंदिरात 'आनंद महोत्सव' साजरा करा. २२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका... तुमच्या जवळच्या मंदिरात एकत्र जमा, मग ते लहान असो किंवा मोठे... तुम्हाला शक्य असेल त्या मंदिरात जा आणि तिथे दर्शन घ्या. जेणेकरून अयोध्येत गर्दी होऊ नये म्हणून आम्ही हे आवाहन करत आहोत", असे चंपत राय यांनी नमूद केले. ते NDTV या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन
अभिषेक समारंभासाठी वैदिक विधी मुख्य समारंभाच्या एक आठवडा अगोदर म्हणजेच १६ जानेवारी रोजी सुरू होईल. अभिषेक सोहळ्यातील मुख्य विधी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 'टेंट सिटी' बांधण्यात येत असून, त्यामध्ये ८० हजार भाविकांची राहण्याची सोय केली जाणार आहे. यामध्ये जेवणाचीही उत्तम व्यवस्था केली जाईल.

अलीकडेच अयोध्येतील राम मंदिरासाठी पुजारी म्हणून मोहित पांडे यांची निवड केली. दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठाचे विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्येच्या राम मंदिरात पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार पुजाऱ्यांच्या मुलाखतींमधून २० जणांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी एक मोहित आहेत. निवड झालेल्या सर्व पुजाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित पांडे हे सीतापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठातून सामवेदचे शिक्षण घेतले. सामवेदचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्यचे शिक्षण घेण्यासाठी ते तिरूपतीला गेले. आचार्यची पदवी घेतल्यानंतर ते पीएचडीची देखील तयारी करत आहेत. अशातच त्यांनी राम मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज केला होता, त्यात त्यांची निवड झाली.

Web Title: ram mandir udghatan Citizens should not come to Ayodhya on January 22 to avoid crowding, said Champat Rai, secretary of Ram Mandir Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.