800 KM धावत प्रवास! भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाची रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 12:30 PM2023-12-17T12:30:17+5:302023-12-17T12:30:34+5:30
रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे.
नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह नामांकित मंडळी हजेरी लावणार आहेत. मागील काही दशकापासून देशाचं राजकारण ज्या वास्तूभोवती फिरत होतं ती वास्तू म्हणजे उत्तर प्रदेशामधील अयोध्येतील राम मंदीर. खरं तर मंदिराचं थोडेच काम बाकी आहे. रामलला लवकरच भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत. यासाठी संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. याच आनंदात एक तरूण राजस्थानमधून अयोध्येत ८०० किलोमीटर धावत प्रवास करणार आहे. एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अवघड नसते, याचाच प्रत्यय राजस्थानमधील कुचामण शहरातील रामसिंग राठोड याने दाखवून दिला.
खरं तर कुचामण शहरातील रामसिंग राठोड हा तरूण कुचामन ते रामजन्मभूमी अयोध्येपर्यंत सुमारे ८०० किलोमीटर धावणार आहे. रामसिंगच्या या प्रवासाची सुरुवात शुक्रवारी गरिवाले बालाजी मंदिरात पूजेनंतर झाली. राठोडने ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेक स्मरणार्थ हा निर्णय घेतला. अखंड भारत होण्यासोबतच राठोड तरूणांना आपले शरीर निरोगी ठेवण्याचा संदेश देत आहे. २१ वर्षीय रामसिंग सैन्य भरतीची तयारी करत आहे. त्याच्या पायी प्रवासाला सुरूवात होण्यापूर्वी शहरातील लोकांनी त्याचे स्वागत केले आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तो कुचामन ते अयोध्येपर्यंत नवन, जॉबनेर, बस्सी, दौसा, कन्नौज, लखनौ, फैजाबाद मार्गे ८०० किलोमीटर धावत प्रवास करेल.
कसा असेल प्रवास -
- एका दिवसात ३० किलोमीटर धावणार
- हा प्रवास ३० दिवस सुरू राहील
- ८०० किलोमीटर धावत प्रवास
- रोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ३० किमी अंतर कापल्यानंतर विश्रांती
अलीकडेच अयोध्येतील राम मंदिरासाठी पुजारी म्हणून मोहित पांडे यांची निवड केली. दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठाचे विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्येच्या राम मंदिरात पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार पुजाऱ्यांच्या मुलाखतींमधून २० जणांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी एक मोहित आहेत. निवड झालेल्या सर्व पुजाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित पांडे हे सीतापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठातून सामवेदचे शिक्षण घेतले. सामवेदचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्यचे शिक्षण घेण्यासाठी ते तिरूपतीला गेले. आचार्यची पदवी घेतल्यानंतर ते पीएचडीची देखील तयारी करत आहेत. अशातच त्यांनी राम मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज केला होता, त्यात त्यांची निवड झाली.