9 नोव्हेंबर रोजी राममंदीराचं निर्माण सुरू करणार - धर्म संसद
By admin | Published: May 7, 2016 01:06 PM2016-05-07T13:06:39+5:302016-05-07T13:06:39+5:30
येत्या 9 नोव्हेंबर रोजी अयोध्येमध्ये राम मंदीराच्या उभारणीचे काम सुरू करण्याचा निर्णय धर्म संसदेने घेतला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
उज्जैन, दि. 7 - येत्या 9 नोव्हेंबर रोजी अयोध्येमध्ये राम मंदीराच्या उभारणीचे काम सुरू करण्याचा निर्णय धर्म संसदेने घेतला आहे. उज्जैनमध्ये सिंहस्थादरम्यान धर्म संसद आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. रामलला परीसरामध्ये सिंहद्वारापासून राम मंदीराच्या बांधकामास सुरुवात होईल असे वृत्त आजतकने दिले आहे.
9 नोव्हेंबर 2016 रोजी कार्तिक अक्षय नवमी असून त्यादिवशीच मंदीर निर्माणाचा आरंभ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे की, एकीकडे राज्यसभेमध्ये सुब्रमण्यम स्वामींनी नुकताच हा प्रश्न उपस्थित केला होता, आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेचे वारे लवकरच वाहू लागणार आहेत.
राम मंदीराच्या निर्मितीमध्ये सरकारचा काही संबंध नसून जनतेच्या सहकार्याने मंदीर निर्माण करण्यात येईल असा दावा धर्म संसदेमध्ये करण्यात आला आहे. धर्म संसदेमध्ये संत आत्मानंद, शाश्वतानंद, नरेंद्रानंद, सुदर्शन महाराज, श्रीमहंत अवध किशोर दास, चंद्रदेव दास यांच्यासह मोठ्या संख्येने संत व भक्तगण उपस्थित होते.
श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण न्यास अयोध्याचे अध्यक्ष महंत जन्मेजय शरण महाराज यांनी सांगितले की, विवादित रामजन्मभूमीची 77 एकर जागा निर्मोही आखाड्याची आहे. मंदीर निर्माण व जमिनीसाठी आखाडा लढाई लढत आहे आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मंदीर निर्माणची गोष्ट करण्यात येत आहे.