राम रहीमवरील दोन हत्येच्या आरोपांची सुनावणी सुरू, व्हिडीओ कॉन्फरन्सने साक्ष, पंचकुलामध्ये प्रचंड बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:50 AM2017-09-17T01:50:41+5:302017-09-17T01:50:44+5:30
आपल्या आश्रमातील साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर दोन हत्या केल्याचा आरोप असून, त्याची सुनावणी शनिवारी न्यायालयात सुरू झाली.
चंदिगड : आपल्या आश्रमातील साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर दोन हत्या केल्याचा आरोप असून, त्याची सुनावणी शनिवारी न्यायालयात सुरू झाली. राम रहीम तुरुंगात असून, सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. राम रहीमचा एके काळचा ड्रायव्हर याने आता या दोन्ही प्रकरणांत राम रहीमचा हात होता, असे म्हटले आहे.
या खटल्याच्या निमित्ताने पंचकुलामध्ये निमलष्करी सैनिकांच्या तुकड्या व हरयाणा पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सीबीआय न्यायालयात आता पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह
यांच्या हत्येविरोधात सुनावणी सुरू झाली असून, ते सिद्ध झाल्यास जन्मठेप वा फाशीची शिक्षा होऊ शकते.
सिरसातील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी ‘पुरा सच’ या सायंदैनिकात डेरा सच्चा सौदाधील अन्याय व अत्याचाराची अनेक प्रकरणे प्रसिद्ध केली होती. डेरामध्ये सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोटही त्यांच्याच वृत्तापत्राद्वारे करण्यात आला होता. त्यानंतर आॅक्टोबर २00२ मध्ये रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात ते मरण पावले. तेव्हापासून त्यांचा मुलगा ही कायदेशील लढाई लढत आहे.
हत्येचे दुसरे प्रकरण
डेरा सच्चाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांची हत्या १0 जुलै २00३ रोजी झाली. राम रहीमने एका साध्वीवर केलेला बलात्कार तसेच एकूणच सारी काळी कृत्ये रणजीत सिंह यांना माहीत होती. त्यामुळे राम रहीमने त्यांचीही हत्या घडवून आणली, असा आरोप आहे. रणजीत सिंह यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेऊ न राम रहीमला शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २00३ मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने २00७ साली रोजी आरोपपत्र दाखल केले.