राम रहीम, लंगाहची दिवाळी कारागृहात, अत्याचार प्रकरणातील आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:02 AM2017-10-21T04:02:09+5:302017-10-21T04:02:59+5:30
अत्याचार प्रकरणात शिक्षा होण्यापूर्वी प्रत्येक दिवस दिवाळीसारखे जगणारे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम व पंजाबचे माजी मंत्री सुच्चासिंग लंगाह यांची यावर्षीची दिवाळी कारागृहात गेली.
चंदीगड : अत्याचार प्रकरणात शिक्षा होण्यापूर्वी प्रत्येक दिवस दिवाळीसारखे जगणारे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम व पंजाबचे माजी मंत्री सुच्चासिंग लंगाह यांची यावर्षीची दिवाळी कारागृहात गेली.
बाबा राम रहीम साध्वीवर तर, लंगाह महिला पोलीस कर्मचा-यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत. बाबा राम रहीम कारागृहात जाण्यापूर्वी हरियाणातील मंत्री त्यांच्यापुढे नतमस्तक होत होते. मताकरिता राजकीय पक्ष त्यांच्या दरबाराचे उंबरठे झिजवत होते. डे-याला रोज कोट्यवधी रुपयांची देणगी मिळत होती. अशी राजविलासी परिस्थिती असताना राम रहीम यांना आपण कारागृहात जाऊ हे स्वप्नातही वाटले नसेल. परंतु, दोन साध्वींनी केलेल्या अत्याचाराच्या तक्रारीमुळे त्यांना कायद्याचा दणका बसला.
एकेकाळी गुरदासपूर जिल्ह्यावर प्रभुत्व गाजविणारे माजी मंत्री सुच्चासिंग लंगाह यांची कथाही वेगळी नाही. १०० कोटींवर रुपयांची संपत्ती असलेले लंगाह यांना सर्व ऐशोआराम सोडून कारागृहात दिवस काढावे लागत आहेत. पूर्वी त्यांची गणना शिरोमणी अकाली दलाच्या दिग्गज नेत्यांसोबत केली जात होती. परंतु, कारागृहात जाताच पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवली.
बाबा राम रहीम यांना सीबीआय विशेष न्यायालयात १० वर्षांचा कारावास व ३० लाख रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. त्यांनी या निर्णयाला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. लंगाह यांचे अपीलही उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.