राम रहीमला न्यायालयातूनच गायब करण्याचा होता कट, कटात सहभागी तीन पोलीस कर्मचा-यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 11:12 AM2017-09-15T11:12:23+5:302017-09-15T11:27:21+5:30
हरियाणा पोलिसांनी कटात सहभागी असणा-या तीन पोलीस कर्मचा-यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचा-यांमध्ये दोन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित, राजेश आणि एक कॉन्स्टेबल राजेश यांचा समावेश आहे.
चंदिगड, दि. 15 - साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला न्यायालयाच्या आवारातूनच पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे या कटात काही पोलीस कर्मचारीही सामील होते. हरियाणा पोलिसांनी कटात सहभागी असणा-या तीन पोलीस कर्मचा-यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचा-यांमध्ये दोन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित, राजेश आणि एक कॉन्स्टेबल राजेश यांचा समावेश आहे. राम रहीमला सीबीआय विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा हे तिघेही सुरक्षेत सहभागी होते.
पंचकुला येथे तिन्ही पोलीस कर्मचा-यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती पंचकुलाचे पोलीस उपायुक्त मनबीर सिंग यांनी दिली आहे. तिघांवर देशद्रोहाचा आरोपही लावण्यात आला आहे. '25 ऑगस्ट रोजी राम रहीमच्या सुरक्षेचा भाग असलेल्या हरियाणाच्या तीन पोलीस कर्मचा-यांना आम्ही अटक केली आहे', असं पोलीस उपायुक्त मनबीर सिंग यांनी सांगितलं आहे.
याशिवाय हरियाणा पोलिसांनी राम रहीमच्या सुरक्षेसाठी तैनात असणा-या पाच पोलीस कर्मचा-यांचं निलंबन केलं आहे. याशिवाय पंजाबमधील तीन पोलीस कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.
एकूण सातजणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सातजणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला.
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.
बाबा राम रहीमने 2002 साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिका-यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिका-यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.