राम रहीम तुरुंगातून वर्षात तिसऱ्यांदा येणार बाहेर; ४० दिवसांचा पॅरोल मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:21 PM2022-10-14T12:21:20+5:302022-10-14T12:22:03+5:30
बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला वर्षात तिसऱ्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात येणार आहे.
बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला वर्षात तिसऱ्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात येणार आहे. आता ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. गेल्या आठवड्यात त्याने पॅरोलसाठी अर्ज केला होता. तेव्हापासून राम रहीम संदर्भात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
पॅरोल दरम्यान राम रहीम उत्तर प्रदेश येथील किंवा राजस्थानमधील बागपत येथील आश्रमात राहणार आहे. राम रहीमला सिरसा आश्रमात यायचे होते पण सरकारने ते मान्य केले नाही अशी माहिती समोर आली आहे. पॅरोलचा आदेश गृहविभागाने यापूर्वीच मंजूर केला होता. मात्र आता जेल नियमावलीनुसार त्याला पॅरोल देण्यात आला आहे.
आधी पावसातले भाषण, आता राहुल गांधीचा पाण्याच्या टाकीवरील व्हिडिओ तुफान व्हायरल
काही दिवसापूर्वी राम रहीम पॅरोलवर बाहेर आल्याच्या प्रकरणाला मंत्री रणजित सिंह यांनीही दुजोरा दिला होता. राम रहीम याच्या नातेवाईकांनी पॅरोलसाठी अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले. पॅरोलसाठी तुरुंगाची स्वतःची व्यवस्था आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुरुंगात असते तेव्हा त्याचे कुटुंबीय पॅरोलसाठी अर्ज करतात, तो त्यांचा अधिकार आहे.
राम रहीम २०१७ मध्ये लैंगिक शोषण प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. यासोबतच पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि रणजित यांच्या हत्येप्रकरणीही त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. यावर्षी पंजाब निवडणुकीपूर्वी ७ फेब्रुवारी रोजी राम रहीम २१ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. यानंतर २७ जून रोजी राम रहीमला ३० दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला.