राम रहीमच्या डे-यात स्फोटके आणि फटाक्यांची फॅक्टरी, डांबलेल्या ४८ जणांची झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:53 AM2017-09-10T00:53:20+5:302017-09-10T00:53:30+5:30
बलात्कारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहीमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सुरू असलेल्या सर्च आॅपरेशनमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आढळत असून, तेथे एक फटाक्यांचा अवैध
सिरसा : बलात्कारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहीमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सुरू असलेल्या सर्च आॅपरेशनमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आढळत असून, तेथे एक फटाक्यांचा अवैध कारखाना होता, अनधिकृतपणे तेथे स्फोटकांचा साठा करून ठेवला होता आणि काही तरुण व अल्पवयीन मुला-मुलींना तेथे डांबून ठेवले होते, असे स्पष्ट झाले आहे.
तेथून ३४ मुले व १४ मुलींची सुटका करण्यात आली आहे. फटाक्यांचा कारखाना सील करण्यात आला आहे. कारखान्याला कुलूप लावून ठेवले होते आणि लोहारांच्या मदतीने ते तोडण्यात आले. तसेच तेथे स्फोटकांचा अवैध साठाही सापडला, असे पोलिसांनी सांगितले. एका खोलीमध्ये काही शंकास्पद औषधे सापडली असून, ती नेमकी कशासाठी वापरली जात होती, याची तपासणी केली जात आहे. औषधांच्या बाटल्यांवर त्यांची नावेही नाहीत.
राम रहीमने आपल्याला अटक झाल्यास दंगल व हिंसाचार घडवून आणा, असे काही समर्थकांना सांगितले होते. त्यासाठी पाच कोटी रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली होती. पोलिसांनी त्यापैकी तीन अनुयायांना अटक केली आहे. त्यांच्यावर ५ कोटी रुपये खर्च करून हिंसा भडकवल्याचा आरोप आहे. चमकौर सिंह, कर्मजीत व दानसिंह अशी त्यांची नावे आहेत. चमकौर सिंह हा डेरा पंचकुला शाखेचा प्रमुख असून, तोच हिंसाचार घडवून आणण्यातील मुख्य आरोपी आहे.
सिरसा डेरामध्ये वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे चलन तयार करण्यात आले होते. लोकांकडून पैसे घेऊन त्यांना प्लॅस्टिकची नाणी दिली जात. हे प्लॅस्टिक चलन सर्व डेºयांमध्ये चालत असे. अशी अनेक नाणी तसेच मोठ्या प्रमाणात जुन्या व नव्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
राम रहीम जेथे ध्यानधारणेला बसायचा, त्या ठिकाणचे (गुहा) खोदकाम जेसीबी यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
डेºयातून १४ मृतदेह गेले मेडिकल कॉलेजला
राम रहीमच्या डेºयाकडून जानेवारी ते आॅगस्ट २०१७ पर्यंत १४ जणांचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी दिले गेले. मात्र वैद्यकीय संस्थेला मृतदेह देताना डॉक्टर वा हॉस्पिटलचे मृत्यू प्रमाणपत्र आणि कुटुंबाचे संमतीपत्र आवश्यक असते.
मृतदेह ताब्यात घेताना वैद्यकीय संस्थेला पोलिसांची संमती घ्यावी लागते. पण डेराकडून वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या बाबतीत कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती, अशीही माहिती समोर आली आहे.
अनुयायी व्यावसायिकाची आत्महत्या
सिरसा डेºयामध्ये ३ कोटी १0 लाख रुपये खर्च करून हॉटेल व रिसॉर्ट सुरू करणाºया बाबाच्या एका अनुयायाने आत्महत्या केली. त्याने डेरासाठी आपली १७ एकर जमीन दिली होती. बाबाच्या अटकेनंतर त्याचा धंदा पूर्णपणे बसला. आपले मोठे नुकसानच बाबामुळे झाले आहे, असे लक्षात आल्यामुळे सोमवीर याने आत्महत्या केली. तो चरखी दादरी या गावचा रहिवासी असून, तो बाबाचा अनुयायीही होता.