विष्णूच्या रुपातील फोटोंमुळे डेरा सच्चाचे राम रहीम अडचणीत
By admin | Published: January 18, 2016 01:43 PM2016-01-18T13:43:47+5:302016-01-18T13:44:37+5:30
स्वत:ला भगवान विष्णूच्या रुपात दाखवल्याबद्दल डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग विरोधात 'ऑल इंडिया हिंदू फेडरेशन'ने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
पंजाब, दि. १८ - स्वत:ला भगवान विष्णूच्या रुपात दाखवल्याबद्दल डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांच्याविरोधात 'ऑल इंडिया हिंदू फेडरेशन'ने पंजाब पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामुळे रामरहीम अडचणीत सापडले आहेत.
' आम्ही पाहिलेल्या एका व्हिडीओमध्ये गुरमीत राम रहीम भगवान विष्णूच्या रुपात दिसत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत' असे ऑल इंडिया हिंदू फेडरेशनचे अध्यक्ष निशांत शर्मा यांनी सांगितले. ' आम्ही याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलो होतो, मात्र अद्याप आमची तक्रा नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे पंजाबच्या पोलिस महानिरीक्षकांची भेट घेणार आहोत,' असेही शर्मा यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांची नक्कल केल्याप्रकरणी व धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विनोदी अभिनेता किकू शारदाला अटक करण्यात आली होती. 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात पलक म्हणून लोकप्रिय असलेल्या किकूने २७ डिसेंबरच्या कार्यक्रमात गुरमीत राम रहीम सिंग यांची नक्कल केली होती. त्याप्रकरणी १ जानेवारी रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व गेल्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी किकू शारदाने माफीही मागितली. अखेर त्याची १ लाख रुपयाच्या जामीनावर सुटका झाली.