सावित्रीबाई फुलेंचा भाजपाला रामराम, नेतृत्वाविषयी नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:38 AM2018-12-07T06:38:09+5:302018-12-07T06:38:17+5:30
भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. त्या बहराईच मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही तसेच घोषित केले. त्यापाठोपाठ सावित्रीबाई फुले यांनी पक्षच सोडला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या आधी फुले यांचा हा निर्णय पक्ष नेतृत्वाला कदाचित न आवडणारा आहे. स्वराज व भारती या आपला निर्णय जाहीर करण्यासाठी सात डिसेंबरपर्यंत वाट पाहू शकल्या असत्या. परंतु, त्यांनी तसे केले नाही व अस्वस्थतेला त्या कारण ठरल्या. फुले पक्षातील प्रमुख दलित नेत्या म्हणून ओळखल्या जात. पक्ष सोडताना त्यांनी पैसा विकासासाठी न वापरता पुतळे उभारण्यावर खर्च केला जात असल्याबद्दल भाजपा नेतृत्वावर टीका केली. भाजपच्या ‘दलितांसोबत भोजन’ धोरणावरही फुले यांनी टीका केली होती. फुले यांनी शरद यादव यांचीही भेट घेतली होती. त्या यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असे दिसते.
>हनुमान मनुवाद्यांचा गुलाम
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या की, भगवान हनुमान दलित व तो मनुवादी लोकांचा गुलाम होता. हनुमानाने रामासाठी सारे काही केले तर मग त्याला शेपूट का दिले व त्याचे तोंड काळे का? त्याला वानर का बनवले?