राम मंदिरप्रकरणी शियांमध्ये पडले दोन गट,अडचणी वाढण्याची शक्यता: शिया लॉ बोर्डाचा वक्फ बोर्डालाच विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:29 PM2017-11-15T22:29:20+5:302017-11-16T04:46:35+5:30
बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादात दोन्ही बाजुंना मध्यस्थी मान्य नसली तरी अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर आणि शिया वक्फ बोर्डने या वादात मध्यस्थी करण्याचे आमचे प्रयत्न हे काही प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय हेतुंनी प्रेरीत नाहीत, असे म्हटले.
लखनौ : बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादात दोन्ही बाजुंना मध्यस्थी मान्य नसली तरी अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर आणि शिया वक्फ बोर्डने या वादात मध्यस्थी करण्याचे आमचे प्रयत्न हे काही प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय हेतुंनी प्रेरीत नाहीत, असे म्हटले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी बुधवारी रविशंकर यांनी भेट घेतली. शिया वक्फ बोर्डने जो काही दावा केला आहे त्याला आम्ही सहमत नाही, असे स्पष्टीकरण शिया पर्सनल लॉ बोर्डने केले आहे. वक्फ बोर्डचे अध्यक्ष वासीम रिझवी यांनी नुकताच केलेला दावा हा प्रसिद्धीसाठीचा खटाटोप आहे, असे लॉ बोर्डने म्हटले. आॅल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना यासुब अब्बास म्हणाले, भांडण मिटत असेल तर चांगलेच आहे. परंतु मशिदीची जागा आम्ही सोडून देत आहोत, असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? मशीद हे अल्लाहचे घर आहे आणि आॅल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड मशिदीची जागा निश्चितपणे सोडून देणार नाही. वासीम रिझवी किंवा शिया वक्फ बोर्डने जो काही दावा केला आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असे लॉ बोर्डने म्हटले.
रविशंकर यांनी अलाहाबादेतील आखाडा परिषदेच्या नेत्यांची व अयोध्येत संतांची भेट घेतल्यानंतर वसीम रिझवी आणि रविशंकर यांनी सोमवारी अयोध्येच्या प्रश्नावर बैठक घेतली. बैठकीनंतर लगेचच रिझवी यांनी समेट घडल्याचे नरेंद्र गिरी यांच्यासोबत जाहीर केले. रिझवी यांनी राम मंदिर अयोध्येत बांधले जाईल व मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या अयोध्या-फैजाबाद भागात मशीद बांधली जाईल असेही जाहीर केले.