"अयोध्येचे राममंदिर हजारो वर्षे टिकेल; भूकंपातही सुरक्षित राहील"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:44 AM2020-08-09T02:44:17+5:302020-08-09T06:48:24+5:30
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा दावा
अयोध्या : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थानावर उभारण्यात येणारे मंदिर मोठ्या भूकंपांनाही तोंड देऊ शकेल अशा मजबुतीने बांधले जाईल व ते किमान एक हजार वर्षे तरी सहज टिकेल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मोठमोठ्या नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांच्या खांबांप्रमाणेच या मंदिराचे खांबही मजबूत असतील व खूप खोल पाया खणून ते बांधले जाईल. त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना तोंड देत मंदिर हजारो वर्षे सहज टिकाव धरू शकेल. चंपत राय असेही म्हणाले की, मंदिराचे बांधकाम करणाºया लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी मला भेटले व मंदिराच्या पायाचा नकाशा अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीने अंतिम नकाशा दिला की, ट्रस्ट तो अयोध्या विकास प्राधिकरणाकडून मंजूर करून घेईल. त्यासाठी जे काही शुल्क भरावे लागेल ते आम्ही भरू. त्यात कोणतीही सवलत आम्ही मागणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अयोध्या आंदोलनात देशभरातील किमान २० हजार साधू-संतांनी भाग घेतला होता. त्या सर्वांना भूमिपूजनासाठी बोलावणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही अयोध्येबाहेरील ९० व अयोध्येतील ५२ साधू-संतांना निमंत्रण दिले. (वृत्तसंस्था)
देशभरात स्वागत
कोरोना साथीचे निर्बंध लागू असूनही भूमिपूजन करण्यावरून झालेली टीका सहन करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेतले व साधू-संतांचे आशीर्वाद घेतले. याचे देशभरात ऐतिहासिक घटना म्हणून स्वागत झाले, असे ते म्हणाले.
४२ कोटी रुपये जमा
मंदिर उभारणीसाठी लागणाºया पैशांविषयी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, ट्रस्टच्या खात्यात सध्या ४२ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम लाखो लोकांनी दिलेल्या एक रुपया ते एक कोटी रुपयांच्या देणग्यांमधून जमा झाली.