राम मंदिर अयोध्येत नाही तर काय पाकमध्ये बांधणार ? - गिरिराज सिंह
By admin | Published: February 7, 2017 09:18 AM2017-02-07T09:18:13+5:302017-02-07T09:26:03+5:30
निवडणुका जवळ येताच भाजपा नेत्यांना 'श्री प्रभू राम' आठवू लागतात.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 7 - निवडणुका जवळ येताच भाजपा नेत्यांना 'श्री प्रभू राम' आठवू लागतात. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या रणनीतींमध्ये अचानक बदल करत सर्व लक्ष केवळ राम मंदिरावर केंद्रीत केले आहे. यापूर्वी विकास कामांच्या मुद्यावर जास्त भर देणा-या भाजपाने निवडणुका जवळ येताच राम नामाचा जप सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.
पत्रकारांनी राम मंदिरासंदर्भात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की,' राम मंदिर अयोध्येत नाही बांधणार तर काय पाकिस्तानात बांधणार?'. शिवाय, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मुद्याला नेहमी भाजपासोबतच का जोडले जाते. असा उलट प्रश्न उपस्थित करत त्यांनी, 'श्री राम केवळ भाजपाचेच नाही तर सर्व राजकीय पक्षांचे आहेत. हिंदू धर्माबाबत श्रद्धा असणा-या कोट्यवधी हिंदूंचे आहेत', अशी प्रतिक्रिया दिली.
गिरिराज सिंह यांच्या आधी भाजपा नेते विनय कटियार यांनी राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणला. ‘ज्याप्रकारे बाबरीचा ढाचा पाडला, त्याचप्रकारे अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल', असे वक्तव्य कटियार यांनी फैजाबादमधील रॅलीला संबोधित करताना केले. मात्र, भाजपाला मतदान करुन विजयी कराल तेव्हाचे हे शक्य आहे, असे सांगत त्यांनी जनतेला भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केले.
सुरुवातीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नोव्हेंबरमध्ये लखनौ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राम मंदिराचा मुद्दा मांडला होता. अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. खुद्द राष्ट्रीय अध्यक्षांनी राम नामाचा जप सुरू केल्यानंतर भाजपा नेते केशव प्रसाद मौर्या यांनीही शहा यांच्या वक्तव्याशी मिळते जुळते विधान केले. आणि आता तर काय भाजपा नेते विनय कटियार यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री आदित्यनाथ योगी यांच्यापर्यंत सर्वच राम मंदिर राग आळवत आहेत.