राम मंदिर आमच्या अजेंड्यावर नाही, भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:44 AM2018-07-15T06:44:02+5:302018-07-15T06:44:35+5:30
पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते
नवी दिल्ली/हैदराबाद : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते आणि राम मंदिराचा विषय आमच्या अजेंड्यावरही नाही, असे भाजपाला जाहीर करावे लागले आहे.
अध्यक्षांच्या विधानावरच खुलासा करण्याची वेळ आल्याने भाजपामध्ये नाराजी दिसत आहे. हैदराबादमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत शहा यांनी तसे विधान केल्याची माहिती भाजपा नेते पी. शेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्या वेळी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल, त्यासाठीची तयारी सुरू आहे, असे अमित शहा म्हणाल्याचे शेखर यांनी पत्रकारांना सांगितले होते.
त्यावर एमआयएमचे नेते असाउद्दिन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर वादाबाबत निवाडा द्यायला हवा, असे मत व्यक्त केले होते. निवडणुकांआधी निकाल लागल्यास भाजपा त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले होते.
>संत, महंतांची समजूत काढण्याचे प्रयत्न
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्याच आठवड्यात नाराज संत-महंतांची समजूत काढण्यासाठी अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, पण त्यासाठी काही दिवस धीर धरा, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपा पुन्हा राम मंदिराचा मुद्दा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याचे जाणवत आहे. दरवेळी निवडणुकांच्या आधी भाजपा राम मंदिराचा विषय उपस्थित करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाजपा आता अडचणीत असल्याने तो मुद्दा बाहेर आणत आहे, अशी टीका शहा यांच्या वक्तव्यामुळे सुरू होताच, भाजपाने बचावात्मक पवित्रा घेतला. अमित शहा यांनी हैदराबादेत तसे विधान केलेच नव्हते, प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असा खुलासा दिल्लीतून केला गेला.भाजपाने २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या आधीही अयोध्येत राम मंदिर उभारण्याची घोषणा केली होती. ती पूर्ण न केल्याने अनेक संत-महंत भाजपावर नाराज आहेत. त्यांनी ती नाराजी बोलूनही दाखविली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू मते एकगठ्ठा मिळविण्यासाठीच भाजपाने हा मुद्दा आणल्याची चर्चा आहे. आपण आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीला लागल्याचेही भाजपाला दाखवायचे आहे.
>मग राम मंदिर का नाही? ठाकरे
पुणे : नोटाबंदी एका क्षणात केली, मग राम मंदिर का नाही करीत, असा सवाल करतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा हा फसव्या घोषणा करणारा पक्ष आहे, अशी टीका केला.